Saturday, September 20, 2025

फुलांचा राजा

फुलांचा राजा

कथा : रमेश तांबे

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इंद्रदेवाने फुलांची एक स्पर्धा भरवली होती. सर्व छोटी-मोठी फुले स्पर्धेला हजर होती. कारण या स्पर्धेतील अंतिम विजेत्याला “फुलांचा राजा” असा किताब मिळणार होता. इंद्रदेवाने ही स्पर्धा नंदनवनात भरवली होती. छान मंडप बांधला होता. कमळ, गुलाब, चाफा, जास्वंद, अबोली, झेंडू, सूर्यफूल, जाई-जुई अशी कितीतरी फुलं आपलं नशीब आजमावण्यासाठी स्पर्धेला वेळेवर हजर होती. काही रंगीत होती, तर काही रंगहीन! काहींना रंग नव्हता पण सुगंध होता, तर काही एकरंगी पण आकर्षक दिसणारी. काही बहुरंगी पण सुगंध नसलेली. काही भाग्यवान अशीही होती की, त्यांना आकर्षक रंगासह छान सुगंधही होता. काहींचा आकार इतका छोटा की लांबून दिसणारच नाहीत, तर काही एवढी मोठी की, त्यांना हातात धरावे कसे असा प्रश्न पडावा. फुलांचे इतके प्रकार की बघणारा पाहून थक्क व्हावा. पण प्रत्येक जण आपलं नशीब आजमावयाला आला होता.

थोड्याच वेळात इंद्रदेव आले. सोबत त्यांचे परीक्षा मंडळदेखील होते. इंद्रदेवाने पाहिले संपूर्ण मंडप फुलांनी भरून गेला होता. गर्दी तर इतकी झाली होती की काही नाजूक फुलांच्या पाकळ्या गळून पडल्या होत्या. सूर्यफूल, कमळ यांसारखी मोठी फुले गर्दीत मध्येच उठून उभ्या राहिलेल्या मुलांसारखी दिसत होती. तर जाई, जुई, प्राजक्ताची फुले नीट बघितल्याशिवाय दिसतच नव्हती. मग इंद्रदेवांच्या सेवकांनी सर्व फुलांना एका रांगेत एकमेकांपासून अंतर ठेवून उभे राहण्यास सांगितले. इंद्रदेव आणि त्याचे परीक्षा मंडळ सगळीकडे फिरून निर्णय देणार होते.

तासाभराच्या निरीक्षणानंतर इंद्रदेवाने आपला निकाल जाहीर केला. गुलाबाला फुलांचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. लाल रंगाचा देखणा गुलाब, बाहेरच्या बाजूस हिरव्या पानांची असलेली आकर्षक नक्षी, सोबतीला मस्त सुगंध शिवाय स्वसंरक्षणासाठी शस्त्रासारखे अंगावर काटेदेखील! गुलाबाची राजा म्हणून निवड होताच टाळ्यांचा मोठा गजर झाला. काही सुगंधी फुले, आकाराने मोठी असणारी फुले मात्र नाराज झाली. सजी फुले या स्पर्धेत नव्हती त्यांनी मात्र एकच जल्लोष केला.

आता गुलाब फुलांचा राजा झाला होता. तसा त्याचा अहंकार जागा झाला. मी आता राजा आहे. माझे तुम्ही ऐकले पाहिजे असे फर्मान त्याने काढले. कोणी त्याच्या जवळ गेलाच तर तो त्याच्यावर काट्यांरूपी शस्त्र चालवायचा. त्यामुळे फुलेच नाही तर फुलपाखरे, चतूर, भुंगे असे कीटकही गुलाबापासून लांब राहू लागले. फुलांमधले खेळीमेळीचे वातावरण गुलाब राजा होताच संपून गेले.

पण काही दिवसांतच गुलाबाचा राजेपणाचा दिमाख गळून पडला. कारण कमळ, जास्वंद, झेंडू, चाफा, पारिजात, मोगरा यांसारख्या अनेक फुलांना विविध देवतांनी आश्रय दिला. अनेकांना विविध धार्मिक कार्यात स्थान मिळाले. पण गुलाबाला राजा असूनही कुणी जवळ केलं नाही. तरुण मुलामुलींनी मात्र गुलाबाला मोठ्या आवडीने हातात घेतलं. पण याची खंत गुलाबाच्या मनात सलू लागली आणि त्याचा अहंकार गळून पडला. आपण फुलांचा राजा असूनही आपल्याला कोणताच मोठा सन्मान मिळाला नाही हे पाहून गुलाब खूपच निराश झाला.

गुलाबाला निराश बघून झेंडू जवळ आला अन् म्हणाला, “महाराज, आपण निराश होऊ नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी, कुणा महान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी आपलीच आठवण काढली जाईल. आमचा संबंध निर्जीव गोष्टीशी येणार. पण प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेहमी आपलीच आठवण काढणार.” हे ऐकून गुलाबाची कळी खुलली आणि मग तो सारी निराशा झटकून मोठ्या आनंदाने वाऱ्यावर डोलू लागला. फुले, फुलपाखरांना बोलावू लागला. कुठल्याही मानसन्मानापेक्षा आपल्या वाट्याला जे आलंय त्यात समाधान मानणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं. हे आनंदी जीवनाचं तत्त्व गुलाबाला समजलं होतं.

Comments
Add Comment