
दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ च्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने केलेल्या एका कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. फरहानने शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटने 'गन सेलिब्रेशन' करत भारताला डिवचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, भारतीय चाहते संतापले आहेत.
नेमके काय घडले?
पाकिस्तानच्या डावाच्या १० व्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना फरहानने एक जोरदार षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने बॅट हातात घेऊन ती बंदुकीसारखी करून हवेत गोळीबार करत असल्याचा अभिनय केला. त्याचे हे सेलिब्रेशन तातडीने कॅमेऱ्यात कैद झाले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाऊ लागला.
Shameful! Look at what Sahibzada Farhan is portraying.This is not cricket, this is the true face of a terror nation. #INDvPAK pic.twitter.com/0mv27mAzTP
— ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳 (@AdvAshutoshBJP) September 21, 2025
भारतीय चाहत्यांचा संताप:
फरहानच्या या सेलिब्रेशनवर भारतीय चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या या कृतीला 'अतिरेक्यांसारखे कृत्य' असे संबोधले आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या या कृतीने भारतीय लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. अनेक चाहत्यांनी सांगितले की, फरहानने केवळ भारतीय संघालाच नाही, तर संपूर्ण देशाला आणि हल्ल्यातील पीडितांना डिवचले आहे.
मैदानावरील कामगिरी:
या वादग्रस्त सेलिब्रेशनपूर्वी फरहानने मैदानावर चांगली कामगिरी केली. त्याला भारताच्या अभिषेक शर्माने दोन वेळा जीवदान दिले. त्याचा फायदा घेत त्याने ४५ चेंडूंमध्ये ५८ धावांची शानदार खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर केलेल्या या कृत्यामुळे त्याचे कौतुक होण्याऐवजी त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.