
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
" माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन" असे म्हणत थोर योगी आणि उच्चकोटीच्या संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओव्या, अभंगांमधून मराठीवर अलंकारांचा साज चढविला आहे. सामान्य माणसाला मराठीचा हा रसाळपणा चाखता यावा म्हणून संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे सार त्यांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहून लोकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यानंतरच्या काळात इंग्रज भारतात आले आणि त्यांनी भारतावर राज्य केले. त्यांच्या सोयीसाठी आणि वैचारिक, व्यवहारिक देवाणघेवाणीसाठी त्यांनी भारतीयांना इंग्रजी शिकवले आणि आपण त्या इंग्रजीचे इतके अधीन झालो की आपली मायबोलीही विसरून गेलो. आपल्या तोंडात इंग्रजी शब्द इतके रुळले की काही शब्दांना मराठीत काय बोलतात इतकेही विस्मरण झाले. आज आपण या लेखातून मराठी भाषेचे महत्त्व समजून घेणार आहोत.
“भाषा” हा मानवी जीवनाचा गाभा आहे. विचार, भावना, ज्ञान आणि संस्कृती व्यक्त करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा. भाषा आपल्यातील संवादाचे माध्यम असते. भाषा संस्कृतीची ओळख असते. भाषा आपल्याला जगवते.प्रगतीचे साधनही भाषाच असते.
१. भाषेचे महत्त्व - भाषा ही संवादाचे साधन आहे. माणूस आपले विचार, कल्पना, अनुभव, ज्ञान आणि भावना भाषेच्या साहाय्याने व्यक्त करतो. संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्य जतन करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. समाजातील एकात्मता, एकोपा आणि राष्ट्रीय एकता भाषेमुळेच शक्य होते. शिक्षण, प्रशासन, तंत्रज्ञान, विज्ञान या सर्व क्षेत्रांत भाषा महत्त्वाची आहे.
२. भाषेची विविधता - भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषांची अपार विविधता दिसून येते.प्रत्येक प्रांत, समाज, जमात यांची वेगळी भाषा किंवा बोली असते. जगात सुमारे ७००० पेक्षा जास्त भाषा आहेत, त्यात भारतीय भाषांचा मोठा वाटा आहे. ही विविधता सांस्कृतिक समृद्धीचे द्योतक आहे.
३. भाषेचे प्रकार - भाषांचे प्रकार अनेक अंगांनी करता येतात :
१. लेखी व बोलीभाषा- लिहिली जाणारी भाषा (उदा. साहित्य) आणि बोलली जाणारी भाषा (उदा. दैनंदिन संभाषण).
२. प्राचीन व आधुनिक भाषा - संस्कृत, पाली, प्राकृत या प्राचीन; तर मराठी, हिंदी, इंग्रजी या आधुनिक.
३. प्रमाण व बोलीभाषा - प्रमाण म्हणजे मान्यताप्राप्त व सर्वत्र वापरली जाणारी भाषा. बोलीभाषा म्हणजे प्रादेशिक उच्चार व शब्दप्रयोगांतील बदल.
४. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषा - राष्ट्रीय पातळीवर हिंदी, तर जागतिक पातळीवर इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश.
४. प्रमाणभाषा - प्रमाणभाषा म्हणजे एका भाषेचा असा शुद्ध, नियमानुसार वापरला जाणारा स्वरूप जो शिक्षण, साहित्य, प्रशासन, माध्यमे या क्षेत्रांत स्वीकारला जातो. उदा. मराठीची प्रमाणभाषा म्हणजे पुणे-मुंबई परिसरातील मराठी. प्रमाणभाषा संवादाला स्पष्टता आणि सुसंगती देते. शिक्षणात प्रमाणभाषेचे महत्त्व विशेष आहे. कारण ती सर्वांना समजणारी आणि स्वीकारलेली असते.
५. बोलीभाषा : बोलीभाषा म्हणजे भाषेचे प्रादेशिक स्वरूप. त्यात उच्चार, शब्दसंग्रह, व्याकरण, वाक्यरचना यांत बदल आढळतो. उदा. मराठीच्या कोकणी, खानदेशी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी, गोव्यातील कोंकणी या बोलीभाषा. बोलीभाषा ही लोकजीवनाशी घट्ट जोडलेली असल्याने त्यात त्या भागाची संस्कृती, लोककला, लोकगीतं, वाङ्मय जपलेले असते.
६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषेचे परस्पर नाते - प्रमाणभाषा आणि बोलीभाषा हे एकमेकांचे विरोधी नसून पूरक आहेत. बोलीभाषा प्रमाणभाषेला समृद्ध करतात. लोकसाहित्य, लोकगीतं, म्हणी, वाक्प्रचार यांचा मोठा खजिना बोलीभाषांमध्ये आहे.
प्रमाणभाषा सर्वसामान्य संवाद व शिक्षणासाठी आवश्यक असली तरी बोलीभाषा सांस्कृतिक वैविध्य जपते. भाषा म्हणजे संस्कृतीचे आरसे. भाषेतील विविधता ही आपली ओळख आहे. प्रमाणभाषा आपल्याला एकत्र आणते, तर बोलीभाषा आपल्याला स्थानिक संस्कृतीशी जोडते. त्यामुळे प्रमाणभाषेचा अभ्यास आणि बोलीभाषेचे जतन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
मानव समाजाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी सर्वात मोठी देणगी म्हणजे भाषा. माणूस आपले विचार, भावना, ज्ञान व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषेचा उपयोग करतो. भाषा केवळ संवादाचे साधन नाही तर ती संस्कृतीचे जतन करणारे, परंपरेचे संवर्धन करणारे व समाजाला एकत्र बांधून ठेवणारे सामर्थ्यवान माध्यम आहे.
भाषेचे महत्त्व : भाषा ही शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, प्रशासन अशा सर्व क्षेत्रांत अनिवार्य आहे. व्यक्ती व समाज यांच्या परस्पर संवादासाठी भाषा आवश्यक आहे. इतिहास, पुराण, लोककला, लोकसाहित्य हे सर्व भाषेमुळेच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले आहे. म्हणूनच भाषेला मानव जीवनात केंद्रस्थानी स्थान आहे.
भाषेमुळे आपण एकमेकांबद्दलचे आपले विचार सांगू शकतो. आपलेपणा, राग, लोभ दाखवू शकतो.भाषेमुळे प्रेम व्यक्त करू शकतो. प्रेमामुळे माणसे, मने, नाती जवळ येतात. हेच खरे भाषेचे सामर्थ्य.