
विशेष : विजया वाड
“त्या पोळ्यावाल्या बाई, चांगल्या घरच्या दिसतात गं सुमा.” “अहो साहेब, चांगल्या घरातल्याच आहेत त्या. काही वेळा आयुष्यात वाईट येतात. माणसं त्या वाईट वेळेला शरण जातात किंवा तडफडतात. बाई स्वच्छ आहेत, पण यजमानांचा अपघात झाला, म्हणून घरीच बसलेत ते.” “कसला अपघात?” “कार धडकली अंगावर ! अहो काय वेळ आणलीन परमेश्वरानं बाईंवर. नाहीतर ११ पोळ्या मला का जड आहेत करायला? पण विचारायला आल्या. परिस्थिती सांगितली. मग मीही काचकूच न करता ठेवून घेतलं.” सुमाचा स्वभाव हळवा होता. साहेब सारं जाणून होते. त्यांचं दु:ख सहन व्हायचं नाही, तसंच सुमाचं सुद्धा होतं. दोघांची जोडी ‘समसमा संयोग की जाहला’ अशीच देवानं गाठ बांधली होती. नाहीतरी ‘गाठी’वरूनच बांधल्या जातात. आपण उगीच शेखी मारतो. ‘मी’ जुळवलं, ‘माझं’ जमलं ! यंव नि त्यंव. देव बघतो वरून. म्हणतो हसून, ‘मजा कर बेट्या!’ शेवट सुद्धा माझ्याचं हाती आहे. आपण नुसतं म्हणायचं, ‘पुण्यशील होता हो तो !’ ‘ देवसुद्धा स्वर्गात मानाची जागा देईल.’ ‘भलं होवो बिचाऱ्या आत्म्याचं’ काय काय बोलतो आपण ! कारण बोलायला आपण जिवंत असतो. नि आत्मा कुणी कधी बघितलाय हो! साऱ्या वृथा कल्पना, वल्गना नि मनाचं समाधान करणाऱ्या गोष्टी ! “एकदा मी बाईंच्या यजमानांना भेटू का गं सुमा?” “भेटा की पण...” “आता कसला पण?” “तिथे जाऊन डोळ्यांतून टिंप गाळायची नाहीत.” “बरं गं मी नाही हळवा होणार मग तर झालं?” त्याने सुमाला आश्वस्त केलं. मग सुमा सुद्धा तयार झाली. साहेबांना आनंदाने तिने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी पोळ्यावाल्या आल्या सुशीला त्यांचे नाव होते. “बाई, हे म्हणतात, साहेब हो ! की त्यांना तुमचे घर बघायचे आहे.” “बाई खाली मान घालून म्हणाल्या, “ बघण्यासारखं काही नाही माझ्या घरात, अहो तेलीगल्लीतली एक बारकी, अंधारी खोली ! त्यात आजारी नवरा. चार भांडी कुंडी नि पाण्याचा माठ!” “त्यांचा फार आग्रह आहे हो सुशीलाबाई.” “बरं” त्या पुढे बोलल्या नाहीत न बोलता पोळ्या लाटू लागल्या. सुरेख, मऊसूत. आमटी फोडणीला टाकली साहेबांना पोळ्यावाल्याबाईंची आमटी खूप आवडायची. सारे काम अगदी निगुतीने उरकले. ओटा पुसून स्वच्छ केला. पदराला हात पुसत म्हणाल्या, “वहिनी, साहेब कधी येतात? माझ्याबरोबरच चला म्हणावे. तेलीगल्लीत हरवायला नकोत साहेब.” “आज. साहेबांना तुमच्याबरोबरच पाठवते. साहेबांना आज रजा आहे ईदची.” “चालेल मग.” पोळ्यावाल्या बाई निघाल्या. “येताय ना साहेब? मजबरोबरच चला.” “अहो पत्ता देऊन ठेवा. मी येतो मागाहून नाश्ताबिश्ता करतो नि येतो.” साहेब म्हणाले. “मज गरिबाघरी गरम गरम भाकरी करून देईन मी साहेबांना चालेल ना?” “अहो बाई, तुमच्या हातच्या पोळ्या खातो तर भाकरी का नाही चालणार?” “बरं ! चला मग. मजबरोबरच चला.” त्या निघाल्या त्यांची पोळ्यांची सारी कामे, चार घरची, झाली होती. “दमायला होत असेल ना हो बाई?” “दमणं, थकणं या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत साहेब.” त्या पदराला कपाळ टिपत म्हणाल्या. साहेब बाईंच्या बरोबर निघाले. गाडीची चावी सोबत घेतली. तशा गडबडीने म्हणाल्या, “अहो साहेब, रिक्षा करू या. ती सुद्धा गल्लीचा तोंडाशी सोडावी लागेल.” “म्हणजे?” “ फार गल्लीबोळात आहे हो घर.” बाई ओशाळून म्हणाल्या. “हरकत नाही. मी चालत चालत येतो, तुमच्यासोबत.” “चला मग येते हं बाईसाहेब. आपल्या परवानगीने साहेबांना भाकरी खाऊ घालते गरम गरम. चालेल ना?” “अगदी चालेल. धावेल, पळेल,” बाईसाहेब हसून म्हणाल्या साहेब पोळ्यावाल्या बाईसोबत निघाले. तेलीगल्ली फारच अरुंद होती. गल्ली-बोळ अनेक होते. साहेबांचे घर प्रशस्त वस्तीत होते. “या साहेब” घर बंद होते बाईंनी कुलूप उघडले. खिडक्या उघडल्या. “हे आमचे गरिबाचे घर. आपले स्वागत आहे.” “हे माझे यजमान ! अपघातात पाय गेले नि रोजंदारी संपली, पण मी आहे ना भक्कम ! चार घरी सन्मानाने पोळ्या लाटते नि घरखर्च जेवायपुरंता भागवते.” साहेब बघतच राहिले. काही वर्षांपूर्वी त्यांच्याच कारच्या खाली ! ततपप् झाली साहेबांची. “तुम्ही अजिबात दु:खी होऊ नका ! मी मनात काही ठेवलं नाही तर तुम्ही कशाला दु:खी होता?”साहेबांच्या मनात बाईंचा मोठेपणा मावत नव्हता !