संगीताचे सुवर्णयुग अर्थात बाबूजी

मराठी असो किंवा अमराठी प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या मनामनात भावगीत गायक आणि चित्रपट क्षेत्रातील निर्माते, संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक सुधीर विनायक फडके अर्थात सगळ्यांचे लाडके बाबूजी हे नाव अजरामर आहे. गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या गीतांमधून बाबूजींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मराठी-हिंदी गीतांचे गायक व संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांच्या गीत आणि संगीताने कानांना तृप्त केले आहे.


सुधीर फडके-प्रसिद्ध मराठी भावगीत गायक आणि चित्रपटक्षेत्रातील निर्माते, संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र ऊर्फ सुधीर विनायकराव फडके. पण बाबूजी या नावाने ते अधिक परिचित होते. बाबूजींचे मूळ गाव देवगड. बाबूजींचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले. गायनाचार्य पं. वामनराव पाध्ये आणि बाबूराव गोखले यांच्याकडे बाबूजींनी काही वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना वयाच्या चौदाव्या वर्षांपासूनच शिकवण्यांचे व संगीत शिक्षकाचे काम करावे लागले. पुढे त्यांनी अधिक संगीत साधनेसाठी मुंबईला प्रयाण केले. तेथेही शिकवण्या, मेळ्यातील गाण्यांना चाली लावून देणे वगैरे करून चरितार्थ चालवला. त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम मिरजेत झाला. मुंबईत आकाशवाणीवर त्यांचा पहिला कार्यक्रम झाला. शिवाय त्यांनी हिज मास्टर्स व्हाॅइस (एच. एम. व्ही. मुंबई) या ध्वनिमुद्रिका संस्थेशी करार करून अनेक गीतांना संगीत दिले व ती गायली. त्यावेळी त्यांनी गायलेली ‘दर्यावरी नाच करी’ व ‘झिमझिम पाऊस पडतो’ ही गाणी विशेष गाजली.


सुधीर फडके यांनी स्नेहल भाटकर यांच्या साथीने संगीत दिग्दर्शन केलेला पहिला हिंदी-मराठी चित्रपट रुक्मिणी स्वयंवर (१९४५) हा होता. तर त्यांनी एकट्याने संगीत दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट प्रभात फिल्म कंपनीचा गोकुल (हिंदी) हा होय. त्यानंतर त्यांनी संगीत दिलेल्या मराठी-हिंदी चित्रपटांची संख्या ही वाढतच गेली. १९४६ सालापासून बाबूजींनी एकंदर ८४ मराठी व २२ हिंदी चित्रपटांतील व इतर अशी ८७७ गीते संगीतबद्ध केली, तर १४४ मराठी व ९ हिंदी चित्रपटांतील व इतर अशी ५११ गीते गायिली. त्यांची अनेक हिंदी-मराठी गाणी अजरामर झाली. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, प्रपंच, संथ वाहते कृष्णामाई, भाभी की चूडियाँ या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक म्हणून त्यांना पारितोषिके मिळाली. १९५५ साली पुणे आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेल्या आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील गीतांना बाबूजींनी उत्स्फूर्त चाली दिल्या आणि स्वत: ती गीते गायिली. या स्वरशिल्पाने इतिहास रचला. १९५८ पासून गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात आणि परदेशात झाले. आजही गीतरामायण म्हटले की मराठी-अमराठी माणूस भावोत्कट होतो. शब्द व स्वर यांचा रससिद्ध आणि विलक्षण परिणामकारक असा संगम गीतरामायण ऐकताना जाणवतो. गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली व तेलुगू भाषेत रूपांतर झाले. ही सर्व गीते गीतरामायणाच्या बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली गेली. बाबूजींचा विवाह ख्यातकीर्त पार्श्वगायिका ललिता देऊळगावकर यांच्याशी झाला. त्यांचे पुत्र श्रीधर फडके हे आघाडीचे संगीतकार-गायक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या जडण-घडणीत खऱ्या अर्थाने बाबूजींचे योगदान मोठे आहे. त्यांच्या संगीताने मराठी कलाकार आणि प्रेक्षकांनी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. भावगीते, भक्तिगीते हा तर त्यांचा हातखंडा होताच; परंतु मराठी लावण्यांनाही त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे. अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांनी त्यांनी आपली संगीतबद्ध केलेली गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहेत. बालगंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे ही त्यातील काही दिग्गज नावे.


शास्त्रीय संगीतापासून कोठी संगीतापर्यंतचे सर्व संगीत प्रकार बाबूजींनी अत्यंत कौशल्याने हाताळले. गायकांनी सुस्वर व सुस्पष्ट उच्चारात गायले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, कुंदनलाल सैगल यांना ते गुरुस्थानी मानत. या सर्वांच्या संगीताचे श्रवण करून त्यांनी आपली विशिष्ट संगीतशैली निर्माण केली. त्यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला मराठी चित्रपट संगीताचे ‘सुवर्णयुग’ असे संबोधले जाते. सुधीर फडके हे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये ‘इंडिया हेरिटेज फाऊंडेशन’च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती. गुजरातमधील दमण, दीव व दादरा नगर हवेली येथील पोर्तुगिज वसाहती मुक्त करण्यासाठी, ‘आझाद गोमंतक’ दलाचे सदस्य होते. तसेच गोवा मुक्ती संग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती. वृद्धापकाळाने बाबूजींचे मुंबई येथे निधन झाले. २००३ साली महाराष्ट्र शासनाने बोरिवली-दहिसर उड्डाणपुलाला त्यांचे नाव देऊन त्यांना मरणोत्तर मानवंदना दिली.


(लेखक मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Comments
Add Comment

नुसती पूजा नको, सन्मानही हवा

रमा सरोदे, प्रसिद्ध विधिज्ञ नवरात्रीचे दिवस अनेकार्थाने महत्त्वपूर्ण असतात. यामागे पौराणिक कथा आहेत, सामाजिक

जेन झी

शरद कदम नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलन केले आणि सत्ता बदल झाला. असंख्य तरुण-तरुणी एका मेसेजवर रस्त्यावर उतरले आणि

लोकसंस्कृतीचे वाहक

विशेष : लता गुठे वासुदेव, जोशी, पिंगळा भारतीय समाजजीवनाच्या सांस्कृतिक परंपरेत लोककलेला अत्यंत महत्त्वाचे

“काहेको दुनिया बनाई...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राज कपूर आणि वहिदा रहमान ही जोडी असलेला ‘तिसरी कसम’ हा १९६६ सालचा चित्रपट.

सिंदुरासूर

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युग सुरू होते. एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हा त्यांच्या

बदलती तरुण पिढी

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे सोशल मीडियावर हल्ली एआयचे भयंकर वादळ घुणघुणत आहे. या मोहाला अनेक तरुण पिढी बळी पडत आहेत.