जेन झी

शरद कदम


नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलन केले आणि सत्ता बदल झाला. असंख्य तरुण-तरुणी एका मेसेजवर रस्त्यावर उतरले आणि नेपाळमध्ये भ्रष्ट राज्यकर्त्यांना सत्तेतून खाली खेचले. बांगलादेश आणि श्रीलंकेत सत्ता उलथवून टाकणाऱ्या आंदोलनात याच पिढीचा सहभाग होता. या आंदोलन काळात आपण सतत ‘जेन झी’ असा शब्द ऐकत होतो. काय आहे हे प्रकरण? यानिमित्ताने जेन झी (Gen Z) हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे.


जेन झी (Gen Z) म्हणजे एक पिढी. साधारणपणे १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली लोकं ही Generation Z (Gen Z) म्हणून ओळखली जातात. १९९७ मध्ये जन्मलेला हा तरुण आता २८ वर्षांचा आहे, तर २०१२ मध्ये जन्मलेला हा तरुणवर्ग आता १५ वर्षांचा आहे. म्हणजे वय वर्ष १५ ते २८ या वयोगटातील तरुण, तरुणीला ‘जेन झी’ पिढी म्हणून ओळखले जाते. काही ठिकाणी १९९५-२०१० असा कालावधीही सांगितला जातो. मुद्दा ‘साल’ कोणतं आहे हा नाही.


नव्या भाषेत बोलायचं झालं तर, बेबी बूमर्स (१९४६-१९६४), जनरेशन एक्स (१९६५-१९८०) मिलेनियल्स / Gen Y (१९८१-१९९६), जनरेशन Z (१९९७-२०१२) आणि २०१३ नंतर जन्मलेले जनरेशन अल्फा म्हणून ओळखले जातात.


आज पन्नाशीच्या पुढे असलेली पिढी ही मैदानी खेळ, एकत्र कुटुंब, सार्वजनिक गणपतीमधील सांस्कृतिक कार्यक्रम, आजोळ यावर वाढलेली आहे. त्यामुळे या पिढीची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. अॅडजस्ट करण्याची सवय लागलेली आहे. व्यवस्थेला शरण जाण्याची वृत्ती आहे. याउलट जेन झी ही पिढी लहानपणापासून इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडियाशी जोडलेली पिढी आहे. भ्रष्टाचाराबद्दल राग आहे. आपली फसवणूक होते आहे याची जाणीव आहे. ती कदाचित घरातील मोठ्या व्यक्तीशी व्यक्त होत नसतील पण ती अस्वस्थ आहे. या पिढीला माहिती, मनोरंजन आणि शिक्षणासाठी डिजिटल साधनांचा वापर नैसर्गिक वाटतो. सामाजिक बदल, पर्यावरण, विविधता यांसारख्या विषयांबद्दल ही मंडळी जागरूक असतात. रील्स, मीम्स, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर जास्त सक्रिय असतात.


अनेक तरुणांचा फोकस क्लिअर असतो. करिअरमध्ये वर्क-लाईफ बॅलन्स आणि फ्लेक्सिबिलिटीला प्राधान्य. म्हणजेच Gen Z ही ‘डिजिटल नेटिव्ह’ पिढी आहे. देशाची लोकसंख्या १४० कोटींच्या पुढे आहे. यातील निम्मी लोकसंख्या ही महिलांची आहे. पुन्हा एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के म्हणजे जवळजवळ निम्मी लोकसंख्या ही तरुण मुलांची वय वर्ष तिशीच्या आतली आहे. आपण या निम्मी म्हणजे अंदाजे सत्तर कोटी लोकसंख्या असलेल्या ‘जेन झी आणि जनरेशन अल्फा’ या पिढीतील माहिती तरुणांची भाषा बोलतो का? त्यांची गाणी, गोष्टी नव्याने रचली आहेत का? त्यांना रुचेल, आवडेल असे आपले कार्यक्रम असतात का?


हे असले प्रश्न आपण स्वतःला कधी तरी विचारणार आहोत की नाही? पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रीला सत्तेतील पन्नास टक्के भागीदारी देणार आहोत की नाही. यापुढच्या काळात सरंजामी वृत्ती फार काळ चालेल असं दिसत नाही.


मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ही त्यांची जगण्याची मुख्य साधनं असून ही डिजिटल नेटिव्ह पिढी आहे. अशी पिढी जी जन्मापासूनच संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोन यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाने वेढलेली आहे आणि त्यामुळे ती या तंत्रज्ञानाचा वापर सहजपणे आणि नैसर्गिकरीत्या करते. याउलट, डिजिटल इमिग्रंट्स म्हणजे अशा व्यक्ती ज्यांनी नंतरच्या आयुष्यात डिजिटल तंत्रज्ञान शिकले आहे. यामध्ये आपली म्हणजे आता पन्नाशीच्या पुढे असलेली पिढी येते.


शाळेत असतानाच ऑनलाइन क्लासेस, YouTube ट्युटोरियल्स, Google सर्च यांचं महत्त्व कळलेलं आहे किंवा त्याचा वापर केलेला आहे. आपल्या पिढीची मनोरंजनाची साधने वेगळी होती किंवा आहेत त्यामुळे दिवसभर ही तरुण मुले काय मोबाइलमध्ये डोके घालून बसली आहेत हा आपला त्रागा समजू शकतो. या जेन झी किंवा मिलेनियम पिढीची मनोरंजनासाठी OTT (Netflix, Prime), गेमिंग, Instagram reels, YouTube shorts ही नवी मनोरंजनाची साधने आहेत.


या पिढीने आपली संवाद शैली devlop केली आहे. जास्त करून शॉर्टफॉर्ममध्ये बोलणं किंवा लिहिणं, WhatsApp, Insta DMs, मेम्स, इमोजी, याचा आधार घेणं. ‘LOL, BRB, OP, Lit’ अशा इंग्रजी स्लँग शब्दांचा मराठी/हिंग्लिश याचा वापर करतात. या पिढीला गंभीर चर्चा करणंही आवडतं, पण हलक्या-फुलक्या स्टाईलमध्ये.


आपण सरसकट असे समजतो की, या तरुण पिढीला कशाचं काय पडलेलं नाही. पण जगभर तरुण पिढी पर्यावरण, सामाजिक बदल या कामात सक्रिय असतात. आपल्याला स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग माहिती असते. स्वीडनमधील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ती वयाच्या सोळाव्या वर्षी तिने हवामान बदलाच्या संदर्भात स्वीडिश संसदेसमोर आंदोलन केले. How Dare You? असं म्हणत ‘ग्लोबल वॉर्मिग’कडे संपूर्ण जगाचे लक्ष वळविले होते. ग्रेटाप्रमाणे भारतातील या तरुण पिढीला सामाजिक आणि सांस्कृतिक भान आहे. पर्यावरण, लिंगसमानता, मानसिक आरोग्य, सामाजिक न्याय यांबाबत ही पिढी अधिक जागरूक आहे. जुनी पिढी जास्त बंधनं घालते असं वाटतं, म्हणून स्वतःचे विचार ते त्यांच्या माध्यमातून ठामपणे मांडत असतात. देशात कितीही जाती धर्मावरून द्वेष पसरविला तरी काही जण त्या सापळ्यात अडकत असतीलही पण जातीपातीपेक्षा प्रेम, फ्रेंडशिप, टॅलेंटला प्राधान्य देणारी ही पिढी आहे.


शिक्षण आणि करिअरबद्दल फोकस असणारी पिढी आहे. वाड-वडिलांनी चिकटवून दिलेल्या नोकरीवर आयुष्य काढणारी ही पिढी नाही. पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा क्रिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजी आधारित म्हणजे IT, Digital Marketing, Startups, Content Creation या क्षेत्रात काम करायला आवडते. परंपरागत व्यवसाय करण्यापेक्षा किंवा वडिलांच्या जागेवर चिकटण्यापेक्षा या पिढीला स्वतंत्र ओळख हवी असते. ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ महत्त्वाचा, म्हणजे नुसतं पैसे कमवणं नाही तर स्वतःला वेळ देणंही महत्त्वाचं वाटतं. म्हणून त्याचं ते आयुष्य जगत असतात.


टू व्हीलरपासून फोर व्हीलरपर्यंत स्वतःचं वाहन, फॅशन, हेअरस्टाईल, म्युझिक, सोशल मीडिया प्रोफाईल यामध्ये स्वतःची वेगळी ओळख ठेवायला आवडते. गाव, शहर कुठेही राहिले तरी सोशल मीडियावर स्वतःचं विश्व निर्माण करतात. त्यांच्या भाषेत बोलायचं तर त्यांचे हजारो, लाखो फॉलर्स असतात. तेवढ्याच view मिळत असतात. यामुळे ताणतणाव वाढता असतो. सोशल मीडियावर सतत तुलना likes, followers, looks यामुळे आत्मविश्वास कमी-जास्त होऊ शकतो.


पालकांची अपेक्षा असते मुला-मुलीने इंजिनियर, डॉक्टर CA व्हावे मात्र यांची स्वतःची आवड क्रिएटिव्ह फील्ड, स्टार्टअप असावं. यातून मग संघर्ष, तणाव वाढत असतो. कधी कधी एकटेपणा, अनिश्चितता जाणवते. Gen Z ही डिजिटल, क्रिएटिव्ह, सामाजिकदृष्ट्या जागरूक पण तणावग्रस्त पिढी आहे.


मला संपूर्ण ही पिढी समजली आहे असं अजून तरी वाटत नाही. पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला जेवढी ही पिढी समजली ते लिहून काढण्याचा प्रयत्न केला आहे. हिमनगाचा हा छोटा तुकडा असावा. नेपाळच्या घटनेनंतर मात्र या पिढीला पन्नाशीनंतरच्या पिढीने म्हणजे बेबी बुमर्स आणि जनरेशन एक्स या आपल्या पिढीने समजून घ्यायला हवं असं मला वाटतं.

Comments
Add Comment

नुसती पूजा नको, सन्मानही हवा

रमा सरोदे, प्रसिद्ध विधिज्ञ नवरात्रीचे दिवस अनेकार्थाने महत्त्वपूर्ण असतात. यामागे पौराणिक कथा आहेत, सामाजिक

संगीताचे सुवर्णयुग अर्थात बाबूजी

मराठी असो किंवा अमराठी प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या मनामनात भावगीत गायक आणि चित्रपट क्षेत्रातील निर्माते,

लोकसंस्कृतीचे वाहक

विशेष : लता गुठे वासुदेव, जोशी, पिंगळा भारतीय समाजजीवनाच्या सांस्कृतिक परंपरेत लोककलेला अत्यंत महत्त्वाचे

“काहेको दुनिया बनाई...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राज कपूर आणि वहिदा रहमान ही जोडी असलेला ‘तिसरी कसम’ हा १९६६ सालचा चित्रपट.

सिंदुरासूर

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युग सुरू होते. एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हा त्यांच्या

बदलती तरुण पिढी

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे सोशल मीडियावर हल्ली एआयचे भयंकर वादळ घुणघुणत आहे. या मोहाला अनेक तरुण पिढी बळी पडत आहेत.