Saturday, September 20, 2025

जाणीव

जाणीव

जीवनगंध : पूनम राणे

पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर पावसाने हैदोस मांडला होता. जणू काही आभाळच फाटले आहे की काय असे वाटत होते. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. टायफाईड, मलेरिया यांसारख्या आजाराने माणसे त्रस्त झाली होती.

पाटलांच्या घरातील सर्वजण तापाने फणफणत होते. गावावरून शिकण्यासाठी आलेला त्यांचा नातू अभय याला मात्र तापाची लागण लागली नव्हती. शाळेला तीन दिवस सुट्टी असल्याने त्याला मावशीकडे सुरक्षिततेसाठी पाठवण्यात आले होते. अभयच्या पालकांना त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे होते, म्हणून त्यांनी अभयला त्याच्या आजीकडे मुंबईला ठेवले होते. अभय स्वभावाने अत्यंत अस्थिर व चंचल होता. “एका जागेवर नीट बसेल तर शपथ!” गावी मोकळ्या अवाढव्य जागेमध्ये हुंदडणे त्याला आवडत होते. इथे मुंबईमध्ये मात्र दहा बाय पंधराच्या रूममध्ये त्याचा जीव मेटाकुटीला येत होता. त्यामुळे गॅलरीतून हॉलमध्ये उडी मारणे हे त्याचे नित्याचे ठरले होते. अभ्यासही तो मन लावून करत नव्हता. अभ्यास करायला बसवल्यास वही आणि पेन हातात घेऊन उगीचच काहीतरी आढेवेढे घेत असायचा. एकेक तास वाढलेले जेवण पुढ्यातच असायचं.

मावशी एका शाळेत शिक्षिका होती. ती स्वभावाने अत्यंत कडक होती. मुलांचे खाण्यापिण्याचे लाड करावेत. मात्र वागण्याच्या बाबतीत शिस्त हवी, असा तिचा कटाक्ष होता. मात्र तिची एखाद्या मुलाला वळण लावण्याची पद्धत निराळी होती. प्रात्याक्षिकातून मुलांना वळण लावणे हा तिचा हातखंडा होता.

मावशीने आदल्या दिवशी मटकी भिजत घालून मटकीला एका कपड्यात घट्ट बांधून ठेवले होते. कपड्याला आरपार करून मटकीचे कोंब कपड्याच्या बाहेर आले होते. मावशीने अभयला जवळ बोलावले. सुक्या मटकीचे दाणे दाखवले व फडक्यातून बाहेर आलेले कोंबही तिने अभयला दाखवले. अभय म्हणाला, ‘‘वा! किती छान आहे मावशी हे!”

मावशी म्हणाली, ‘‘हे बघ अभय, केवळ छान म्हणून जमायचं नाही, तुलाही प्रयत्न करावे लागतील.” सुई शिवाय कपड्याला आपण छिद्र पाडू शकत नाही हे तुला माहीत आहे ना, मात्र या मटकीच्या प्रत्येक दाण्याने आपली सर्व ऊर्जा एकवटून कपड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे. बेटा, तू खूप हुशार आहेस! ‘‘तुझ्यात खूप ऊर्जा आहे. एकाग्रतेने तू अभ्यास केलास तर शाळेत तुझाही प्रथम क्रमांक येऊ शकतो.”

मावशीच्या बोलण्याचा परिणाम अभयच्या मनावर तत्काळ झाला. शाळेतून दिलेला गृहपाठ तो मन लावून करू लागला. सहामाही परीक्षेत त्याचा प्रथम क्रमांक आला. शाळेतही वर्ग शिक्षकांना आश्चर्य वाटले. त्यांनी अभयला विचारताच अभयने मावशीकडे गेल्यानंतर मटकीला आलेल्या मोडांविषयी साऱ्या वर्गाला माहिती दिली. दुसऱ्या दिवशी तो मटकी भिजत घालून कपड्यातून बाहेर आलेले मोड शाळेमध्ये सर्व मुलांना दाखवण्यासाठी घेऊन आला. सर्व विद्यार्थ्यांनाही खूप आनंद झाला. शाळेतील सर्वांनीच मनोमन अभ्यास करायचे ठरवले.आपल्यातील ऊर्जेचे एकत्रीकरण करून त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करायचा असेही ठरले. प्रत्येकाला बलस्थानची जाणीव झाली. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभयचे कौतुक केले.

तात्पर्य : मुलांनो, आपल्याला परमेश्वरानेच पंचज्ञानेन्द्रिये देऊन इतरांपेक्षा वेगळे बनवले आहे. त्याची जाणीव ठेवून आपण आपले जीवन सजवले पाहिजे.

Comments
Add Comment