लोकसंस्कृतीचे वाहक

विशेष : लता गुठे


वासुदेव, जोशी, पिंगळा


भारतीय समाजजीवनाच्या सांस्कृतिक परंपरेत लोककलेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः ग्रामीण भागात लोककलाकार केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर धर्म, अध्यात्म, समाजप्रबोधन या सर्वांशी अतिशय घट्ट नाते जोडून असल्यामुळे लोकसंस्कृतीचे ते वाहक होते. संत शिरोमणी एकनाथ महाराजांच्या भारुडांमध्ये या लोककलाकाराला महत्त्वाचे स्थान मिळाले. नाथांनी वासुदेव, जोशी आणि पिंगळा या भारुडांमधून वासुदेव आणि पिंगळा यांसारख्या पारंपरिक लोककलाकारांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.


१. वासुदेव
रामप्रहारी टाळ वाजवत येणारा वासुदेव सर्वपरिचित आहे. त्याचा सात्वीक रंगीत वेश धारण करून मोराच्या पिसांची शंकूसारखी डोक्यावर उलटी टोपी, कपाळावर उभा गंध, घोळदार अंगरखा, गळ्याभोवती उपरणं तसेच कमरेला बांधलेले उपरणे, धोतर व पायात जोडे. अशाप्रकारे आगळे वेगळे हे व्यक्तिमत्त्व. एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळ्या वाजवत त्या टाळाच्या सूरात गोड आवाजात म्हटले जाणार गाणं. त्याच्या आवाजाने सारं गाव जाग व्हायचं.
बाया बापड्या आदरपूर्वक त्याच्या झोळीत जमेल ते दान देऊन त्याचे आशीर्वाद घेत असत. वासुदेव कृष्णभक्त मानले जातात. म्हणूनच त्यांना ‘वासुदेव’ म्हटले जाते. त्यांची गाणी ही कृष्णभक्ती, रामभक्ती किंवा लोकशिक्षणपर संदेश असतात. पूर्वी गावकऱ्यांच्या घरांमध्ये शुभशकुनासाठी वासुदेवाचे आगमन मानले जाई.
धन्य जगी तोची एक हरी
रंगी नाचे |
रामकृष्ण वासुदेव
सदा स्मरा वाचे ||
वरील दोन ओळींमधून वासुदेवाचे श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येते. वासुदेव लोकांना धार्मिकतेसोबत नैतिकतेचे धडे देतात. त्यांच्या गाण्यांतून सत्य, प्रामाणिकपणा, दया, करुणा या जीवनमूल्यांचे संदेश दिले जातात. ते गावोगावी फिरून लोकांना एकत्र गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश देतात. ग्रामीण संस्कृतीत ‘वासुदेव आला म्हणजे घरात मंगलकार्य होणार’ अशी श्रद्धा होती; परंतु बदललेल्या सामाजिक संस्कृतीबरोबर हे लोककलाकार आता नाहीसे होत आहेत.
प्रत्येक दारोदार जाऊन दान मागणारा वासुदेव आता मात्र कुठे दिसत नाही. आजच्या आधुनिक माध्यमांपूर्वी या लोककलाकारांनीच संस्कार, ज्ञान आणि मनोरंजनाचे कार्य पार पाडले. महाराष्ट्रात वासुदेव, जोशी, पिंगळा, गोंधळी असे अनेक लोककलाकार आपल्याला दिसतात. त्यांच्या कलाकृतींमध्ये लोकविश्वास, देवभक्ती, लोकरीती आणि जनजीवनाचे दर्शन घडते.


२. जोशी
असाच दुसरा लोककलाकार म्हणजे जोशी
‘जोशी’ हे नाव बहुतेकदा पंचांग सांगणारे, भविष्य सांगणारे वा धार्मिक विधी करणारे व्यक्ती यांच्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जोशी हा लोककलाकार म्हणूनही ओळखला जातो. जोशींचे काम मुख्यतः पंचांग सांगणे, पत्रिका बनवणे, ग्रह-नक्षत्रांचे भाकीत सांगणे, शुभाशुभ सांगणे असे असे. ते जत्रा, उत्सव, गावच्या सोहळ्यांमध्ये बसून लोकांना त्यांचे भविष्य सांगत असत आणि यांच्या भविष्यावर लोकांचीही श्रद्धा
असे. यामुळे
ग्रामीण समाजात जोशीला एक वेगळा मान असतो. शेतकरी पीक पेरायच्या आधी, घरात नवीन काम सुरू करण्यापूर्वी, लग्न-समारंभाच्या तारखा ठरवताना जोशींचे मार्गदर्शन घेत असत. त्यामुळे जोशी हे लोकजीवनाचे मार्गदर्शक मानले गेले होते. संत एकनाथांनी लिहिलेल्या भारुडातील जोशीविषयी खालील ओळी...
आलो रायाचा जोशी ।
होरा ऐका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा ।
विश्वास धरू नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा ।
पाडील फशी ॥२॥
वासना बायको ...
मी आलो रायाचा जोशी
माझा होरा ऐका दादांनो
अशाप्रकारे अध्यात्मिक तत्त्वज्ञान अतिशय सोप्या साध्या शब्दातून सांगणारे जोशी. माणसांमधील विकार माणसालाच किती घातक आहे हे तो
सांगतो आहे.


३. पिंगळा
पिंगळा हा लोककलाकार लोकसंस्कृतीचा वाहक म्हणून समजला जातो. वासुदेवाप्रमाणे भल्या सकाळी अंगणात येणारा पिंगळा हा विशिष्ट पोशाखावरून त्यांची ओळख होते. त्यांच्या खांद्यावर घोंगडी असते, सदरा व धोतर घालतात आणि डोक्यावर रंगीबेरंगी चिंध्यांपासून बनवलेली खास टोपी असते. काखेला मोठी झोळी घेऊन फिरतात. पिंगळा हा महाराष्ट्रातील एक अद्वितीय लोककलाकार आहे. त्याच्या हातात ‘पिंगळा’ नावाचे वाद्य असते. या वाद्यातून तो वेगवेगळ्या आवाजात बोलतो. पिंगळा साधारणपणे अंध असतो; परंतु त्याची स्मरणशक्ती आणि भाषणकौशल्य अद्भुत असते.
पिंगळा श्रोत्यांना रामायण, महाभारत, पुराणकथा सांगतो. त्याच्या कथनात विनोद, व्यंग, गोडवा आणि शिकवण यांचा समावेश असतो. गावोगाव फिरून तो भक्तिरस, वीररस आणि लोकशिक्षणाचा संदेश पसरवतो. पिंगळा या भारुडातून संत एकनाथ महाराज सांगतात...
“पिंगळा महाद्वारीं बोली
बोलत देखा।
डोर फिरवितो डुगडुगी ऐका।।”


पिंगळ्याचे बोलणे हे मनोरंजनाबरोबरच ज्ञान देणारे असते. तो समाजातील दोष, वाईट सवयी यावरही भाष्य करतो. त्यामुळे तो एकप्रकारे जनजागृती करणारा लोककलाकार ठरतो.
ज्या वेळेला समाज अडाणी, अज्ञानी, अशिक्षित होता त्या काळामध्ये अंधश्रद्धा नाहीशा करून श्रद्धेला महत्त्व दिले. पिंगळा या कलाकाराने लोकशिक्षणाचे कार्य लोकांना समजतील अशा ग्रामीण भाषेमध्ये कथा सांगून त्यातून समाज प्रबोधन केले. वरील तीनही कलाकारांनी गावागावांतून फिरून ग्रामीण जीवनातील कष्टमय वातावरणात आनंद व विरंगुळा निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. तसेच परंपरा व संस्कृतीचे जतन आणि
संवर्धन केले.


सारांश :
वासुदेव, जोशी, पिंगळा हे केवळ कलाकार नाहीत तर ते समाजाचे संस्कारकर्ते आहेत. त्यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य करून ग्रामीण समाजाला एकत्र बांधले. आधुनिकतेच्या प्रवाहातही या लोककलेचे जतन करणे आवश्यक आहे, कारण हाच आपला सांस्कृतिक वारसा आहे.

Comments
Add Comment

नुसती पूजा नको, सन्मानही हवा

रमा सरोदे, प्रसिद्ध विधिज्ञ नवरात्रीचे दिवस अनेकार्थाने महत्त्वपूर्ण असतात. यामागे पौराणिक कथा आहेत, सामाजिक

संगीताचे सुवर्णयुग अर्थात बाबूजी

मराठी असो किंवा अमराठी प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या मनामनात भावगीत गायक आणि चित्रपट क्षेत्रातील निर्माते,

जेन झी

शरद कदम नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलन केले आणि सत्ता बदल झाला. असंख्य तरुण-तरुणी एका मेसेजवर रस्त्यावर उतरले आणि

“काहेको दुनिया बनाई...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राज कपूर आणि वहिदा रहमान ही जोडी असलेला ‘तिसरी कसम’ हा १९६६ सालचा चित्रपट.

सिंदुरासूर

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युग सुरू होते. एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हा त्यांच्या

बदलती तरुण पिढी

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे सोशल मीडियावर हल्ली एआयचे भयंकर वादळ घुणघुणत आहे. या मोहाला अनेक तरुण पिढी बळी पडत आहेत.