Saturday, September 20, 2025

वय चोरणाऱ्या महिला लाडक्या बहीण योजनेतून बाद

वय चोरणाऱ्या महिला लाडक्या बहीण योजनेतून बाद
लातूर : एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ मिळेल असे फडणवीस सरकारने आधीच जाहीर केले आहे. पण काही कुटुंबातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असल्याचे दिसत आहे. या व्यतिरिक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठीच लाडकी बहीण योजना असताना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असूनही योजनेचे लाभ घेतल्याचे सिद्ध झाले आहे. आता या गैरफायदा घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकट्या लातूर जिल्ह्यातल्या चार हजार ८२७ महिला याच कारणांमुळे योजनेतून बाद झाल्या आहेत. महिला, मुलींना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची नियमावली सरकारने आधीच जाहीर केली आहे. पण नियमांना डावलून स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन काही महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू केली आहे. गैरफायदा घेणाऱ्या तसेच नियमात न बसणाऱ्या जिल्ह्यातील महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. काही कुटुंबांतील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतानाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने फेरपडताळणी करण्यात आली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात ५ लाख ९२ हजार २३१ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७७२ प्रस्ताव अपात्र ठरले. लातूर जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार ४५९ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात १६१६ महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या संशयावरून ५५ हजार ०९२ महिलांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ३ हजार २११ महिला अपात्र ठरल्या आहेत.
Comments
Add Comment