Saturday, September 20, 2025

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आज राज्यभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्सोवा-वेसावे समुद्र किनाऱ्यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात 'समुद्र माझा, मी समुद्राचा' हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात मत्स्यव्यवसाय विभाग आणि सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून व्यापक सहभाग नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी ‘प्लास्टिकमुक्त कोळीवाडे’ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज या स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभाग घेऊन त्यांनी किनाऱ्यावरील कचरा गोळा केला आणि स्थानिकांना प्लास्टिकविरोधी जनजागृती केली.

आपल्या घरासारखाच समुद्रही स्वच्छ ठेवूया” - राणे यांचे आवाहन

नितेश राणे यांनी या प्रसंगी महत्त्वपूर्ण मुद्द्याला वाचा फोडली. त्यांनी सांगितले की, “कोळी बांधवांचा उदरनिर्वाह ज्या समुद्रावर अवलंबून आहे, त्या समुद्राची आपण जाणीवपूर्वक किंवा नकळत घाण करत आहोत. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा समुद्रात टाकल्याने तोच कचरा जाळ्यात अडकतो आणि त्याचा थेट परिणाम मत्स्य उत्पादनावर होतो. किनाऱ्यांवर घाणीचे साम्राज्य पसरते. आपण समुद्राला खरंच आपला समजतो का? आपल्या घराप्रमाणे समुद्राची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” या अभियानात स्थानिक मच्छीमार, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. किनाऱ्यावरील टनावारी प्लास्टिक व इतर घनकचरा गोळा करण्यात आला. 'समुद्र माझा, मी समुद्राचा' या घोषवाक्याद्वारे समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता राखण्याचा आणि पर्यावरण संतुलन जपण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे प्लास्टिक प्रदूषणाविरोधात लढा, मत्स्य व्यवसायाचे संरक्षण आणि समुद्राची स्वच्छता या तिन्ही मुद्द्यांवर जनतेत नवी जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment