
भारतासोबत युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये नुकताच संरक्षण करार झाला आहे, ज्याच्या जिवावर पाकिस्तानचे मंत्री पुन्हा एकदा माकड उड्या मारू लागले आहेत. त्याचे एक पहिले उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक भारताविरुद्ध एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले की, जर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल. ते म्हणाले की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील अलीकडील करारात सामरिक परस्पर मदतीची तरतूद समाविष्ट आहे.
ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी चॅनेल जिओ टीव्हीशी बोलताना या कराराची तुलना नाटोच्या कलम ५ शी केली, ज्यामध्ये 'सामूहिक संरक्षण' हे तत्व लागू होते. याचा अर्थ असा की जर कोणत्याही सदस्य देशावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्य देशांवर हल्ला मानला जातो. सौदी अरेबियासोबतचा हा करार आक्रमक नसून बचावात्मक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाटोचे उदाहरण देत ते म्हणाले की जर कोणावरही, मग तो पाकिस्तान असो वा सौदी अरेबिया, हल्ला झाला तर दोन्ही देश एकत्रितपणे त्याचा सामना करतील. वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले की हा करार कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी वापरण्याचा हेतू नाही. जर पाकिस्तान किंवा सौदी अरेबियाला कोणताही धोका निर्माण झाला तर ही व्यवस्था आपोआप लागू होईल.
पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध राहतील. त्यांनी स्पष्ट केले की, या नवीन कराराअंतर्गत पाकिस्तान सौदी अरेबियासोबत आपल्या क्षमता सामायिक करण्यास तयार आहे. आसिफ यांनी असेही म्हटले की, पाकिस्तानने नेहमीच आपल्या अण्वस्त्र सुविधांवर देखरेख ठेवण्याची परवानगी दिली आहे आणि कधीही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे. ज्याचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबिया कराराबद्दल भारतीय तज्ञांचे मत
या कराराबद्दल भारत सरकारने असे म्हटले की हा करार दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण व्यवस्थेला औपचारिकता प्रदान करतो. तसेच त्याचे परिणाम विश्लेषण सध्या केले जात आहेत. दरम्यान, लष्करी आणि राजकीय तज्ञांनीदेखील या कराराबद्दल आपले मत व्यक्त केले आहेत. त्यांनी नमूद केले की हा करार सौदी अरेबियाच्या आर्थिक संसाधनांना पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाशी जोडतो आणि दोन्ही देशांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पण या करारामुळे भारताच्या संरक्षण प्राणलीवर कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होईल असे वाटत नाही.