Saturday, September 20, 2025

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नियमानुसार भरपाई दिली जाणार आहे. पंचनामा प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नियमानुसार भरपाई दिली जाईल. यासाठी शासनाकडून ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे, असे ते म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे ७ लाख ७४ हजार ३१३ शेतकऱ्यांचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. यासाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांचे १ लाख ५१ हजार २२२.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यांना १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या पावसामुळे १४२ शेतकऱ्यांचे २१.६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. त्यासाठी शासनाने ३ लाख २३ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. सांगली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे १३ हजार ४७५ शेतकऱ्यांचे ४ हजार ७४.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ७ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात शासन संवेदनशील असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांच्या पंचनामा अहवाल शासनास प्राप्त होताच शासनाने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. तसेच, नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत यासाठी संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment