
नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात पत्रकारांना काही गावगुंडांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मंत्रालयातूनही याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तीन पत्रकारांवर गावगुंडांनी जबर हल्ला केला. हा हल्ला पार्किंग वासुलीच्या बाचाबाचीतून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही मारहाण का करण्यात आली याचा खुलासा पीडित पत्रकाराने नुकताच एका वृत्त वाहिनीसमोर केला आहे.
मारहाण का झाली?
या हल्ल्यात पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या किरण ताजणे यांनी मारहाणीच्या घटनेवेळी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती त्यांनी वृत्तवाहिनीला दिली. किरण ताजणे म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकनासाठी आलो आहे, असे सांगूनही त्यांना मारहाण केली गेली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत हल्ला केला.मुख्यमंत्र्यांकडून आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश
राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे, तसेच या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत, आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, पोलिसांकडून आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषिकेश योगेश गांगुर्डे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करत या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहिती अपेक्षित आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच या धक्कादायक घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.