
स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही
मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यांवरुन महायुती सरकारला घेरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना भाजपकडून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये ‘इंदुरी चाट आणि बरंच काही...’ हे उपहारगृह सुरु केल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे मुंबईतच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतेच मुंबईतील दादर या मध्यवर्ती भागात ‘इंदुरी चाट आणि बरंच काही...’ हे उपहारगृह उघडले आहे. या उपहारगृहात मध्य प्रदेश येथील इंदोरमधील विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. या उपाहारगृहाची नुकत्याच एका फुड ब्लॉगरने सोशल मीडियावर माहिती दिली होती.
खुद्द संदीप देशपांडे यांनीच एक्सवरुन व्हिडिओ शेअर करत ‘सुप्रसिद्ध आणि नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथे मी सुरु केलेल्या ‘इंदुरी चाट आणि बरंच काही....’ या उपहारगृहाला भेट दिली’ असे देशपांडे यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते.
सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरु केलेल्या "इंदुरी चाट आणि बरंच काही...."या उपहार गृहाला भेट दिली pic.twitter.com/1ZtKJeRfoo
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 19, 2025
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरुन याचा समाचार घेण्यात आला आहे. ‘या हॉटेलचा कूक परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय, नाव देवनागरी लिपीत लिहिले आहे. यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही, आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा हिंदुत्ववादी विचारांचा अशा शब्दात संदीप देशपांडे यांना भाजपकडून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
तसेच राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा एकत्रित फोटो लावत ‘हमारे संदीप भय्या के दुकान में आने का हा’ असे वाक्यही भाजप समर्थकांनी राज ठाकरेंच्या तोंडी टाकलं आहे.
मुंबई महापौरपदावरुन इशारा
दोनच दिवसांपूर्वी, संदीप देशपांडे यांनी ‘मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार’ असा इशारा भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या वक्तव्यावर टीका करताना दिला होता.