वॉशिंग्टन: ट्रम्प यांनी नवीन शुल्क लागू करण्याच्या घोषणेनंतर, H-1B व्हिसाच्या ७०% पेक्षा जास्त वाटा असलेल्या भारतात व्यापक चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जे अमेरिकेत काम करत असलेल्या भारतीयांसाठी दिलासादायक आहे.
अमेरिकन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, एच-१बी व्हिसासाठी नव्याने जाहीर केलेले $१००,००० वार्षिक शुल्क केवळ नवीन अर्जांवर लागू होईल, विद्यमान व्हिसाधारकांना किंवा नूतनीकरण करणाऱ्यांना हा नियम लागू होणार नाही, या स्पष्टीकरणामुळे भारतीय व्यावसायिकांमधील चिंता कमी होईल.
अधिकाऱ्याच्या मते, ज्या व्यक्ती आधीच H-1B व्हिसावर आहेत, तसेच सध्या परदेशात प्रवास करणारे किंवा भारतात येणारे यांचा समावेश आहे, त्यांना नवीन नियम लागू होण्यापूर्वी अमेरिकेत परतण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही. "जे लोक H-1B व्हिसावर परदेश दौऱ्यावर आहेत, किंवा अमेरिकेच्या बाहेर आहेत. त्यांना रविवारपूर्वी परत अमेरिकेत येण्याची किंवा $१००,००० शुल्क भरण्याची गरज नाही. $१००,००० फक्त नवीन धारकांसाठी आहे, सध्याच्या धारकांसाठी नाही," असे अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले.
अमेरिकेने एच-१बी व्हिसा कार्यक्रमावर वार्षिक १००,००० डॉलर्सचे मोठे शुल्क लादण्याच्या निर्णयाच्या परिणामांबद्दल नवी दिल्लीने शनिवारी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे अनेक कुटुंबे विस्कळीत होऊ शकतात आणि भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिकांना तसेच रेमिटन्सला त्याचा फटका बसू शकतो, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिला आहे.