‘गोलकोंडा डायमंड्स’ एक प्रभावी प्रायोगिकता

‘गोलकोंडा डायमंड्स’


एक प्रभावी प्रायोगिकता


भालचंद्र कुबल


प्रायोगिक नाटक अथवा रंगभूमी हा शब्दप्रयोग साहित्य व्यवहारात नेमका कधी सुरू झाला असावा? हे जरा सांगता येणे थोडे कठीण आहे, तरीही अंदाजे मराठी रंगभूमीच्या बाबतीत जेव्हा रंगायन ही नाट्यसंस्था सुरू झाली आणि विजया मेहतांनी आर्थिक यशापयशाचा विचार न करता एकांकिका, दीर्घांक आणि नाटके आदींचे प्रयोग करायला सुरुवात केली, त्यावेळेसच या शब्दप्रयोगाची निर्मिती झाली असावी. पुढे अपारंपरिक नाटकांना प्रायोगिक म्हणायची जणू प्रथाच रूढ झाली. पारंपरिक नाटकास जशा रिती, पद्धती होत्या, शैली होती तशी अपारंपरिक नाटकास होतीच असे सांगता येणार नाही. मराठी प्रायोगिक रंगभूमीचा विचार करता डॉ. श्रीराम लागू यांचे विधान लक्षात घ्यावे लागते. ते म्हणतात की, “आपण पहिल्यापासूनच प्रायोगिकतेचा चुकीचा अर्थ घेतला. मराठीत प्रायोगिक काय आहे त्या ऐवजी अमेरिकेत काय प्रायोगिक चालले आहे याचाच विचार करत आलो”. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमी हा शब्दप्रयोग ६० नंतरच्या काळातच अधिक फोफावला कारण आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशन वाढले. म्हणून मराठी रंगभूमीची दखल घेताना नेहमी साठोत्तरी मराठी नाटक हा उल्लेख आधीचे आणि नंतरचे अशा विभाजनासाठी सोयीचा ठरतो. ७० च्या दशकात तर नव्या विचाधारेने आणि नव्या नाट्य-प्रेरणेने भारावलेल्या तरुणाईने प्रायोगिकतेचे लगाम हाती घेतले. ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ ‘आय.एन.टी.’ ‘पिडीए’, ‘आविष्कार’, ‘कलावैभव’, ‘रंगायन’ इत्यादी संस्थानी प्रायोगिकतेच्या अंगाने नाटकाची नवी परिभाषा व नवी विचारतत्त्वे शोधायचा प्रयत्न केला. पैकी आज अनेक संस्था बंद पडल्या असल्या तरी आविष्कार, आय.एन.टी. तग
धरून आहेत.
‘गोळकोंडा डायमंड्स’ हे आविष्कारने निर्मिलेले एक नवे नाटक अथवा दीर्घांक बघण्याचा योग मुंबई मराठी पत्रकार संघाने छोटेखानी नाटकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या मंचावर पाहाण्याचा योग आला. कौस्तुभ आणि गंधर्व हे दोन तरुण एकत्र रेल्वे प्रवास करत आहेत. इच्छित स्थळी न उतरल्याने टी.सी. त्याना पुढील स्थानकात उतरावयास भाग पाडतो. उतरल्यावर त्यांच्या लक्षात येतं की त्या स्थानकातून कुठलीही गाडी येत नाही किंवा जात नाही. इथे मोबाइला रेंजही नाही. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हे सांगणेही त्यांच्या दृष्टीने कठीण होऊन बसले आहे. स्वतःच्याच चाकोरीत अडकवून घेतल्यामुळे प्रथमतः एकमेकांचे दुर्लक्षित अॅप्रोच एकमेकांशी बोलायला भाग पाडतात. याच सुमारास एक म्हातारा त्यांना भेटतो. तो त्यांच्या पूर्वजांकडे असलेल्या गोळकोंडा डायमंड्सची गोष्ट सांगतो. तो जर मिळवलात तर समाजात चाललेल्या अनिष्ट प्रकारांवर त्या डायमंडमुळे मात करता येईल असे सांगतो. त्यामुळे एक अज्ञात मानव कल्याण शक्ती जर ह्या डायमंडमुळे प्राप्त झाली तर आयुष्य पुन्हा पूर्ववत मूळ पदावर येऊ शकते आदी आशावाद दर्शवत नाटक संपते. नाटकाचे कथानक आणि संदर्भ कळायला तसे कठीण आहेत म्हणूनच प्रथमच या नाटकाचे निरीक्षण लिहिताना कथानकावर घसरलो; परंतु ह्या कथाबीजापलीकडेही या दीर्घांकाचे कथानक आहे हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावे. नाटकाची मांडणी सहज सोपी नसून त्यात गुंतागुंत फार आहे. माणसाची जगण्याबाबतची अगतिकता दर्शविणे हे अल्टीमेट ध्येय असल्याने, तार्किकतेचा मार्ग सुलभ न होता तो क्लिष्ट होतो. सर्वसामान्य प्रेक्षकांपेक्षा बुद्धिवादी प्रेक्षकवर्गाला या दीर्घांकातील नाट्य रुचणारे आहे.
कदाचित हीच योगेश्वर बेंद्रे या नव्या पिढीच्या लेखकाची शैली असावी. नाही म्हणायला नाटक थेट आहे; परंतु त्यातील आशय आणि त्याची मांडणी सर्वसामान्यांच्या बुद्धिमत्तेला पेलेलच अशी खात्री देता येत नाही. गेल्या वर्षी एन.सी.पी.ए.ने घेतलेल्या “दर्पण” या लेखन स्पर्धेतील ही विजेती संहिता होती. संदेश दुगजे या दिग्दर्शकाने मात्र ही संहिता पुरती समजून घेत त्यावरील प्रसंग अॅबजर्ड पद्धतीने मांडले आहेत. मुळात अॅब्जर्डीजम हाच या नाटकाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या व्याख्या (इंटरप्रिटेशन या अर्थी) धुसर अथवा एकमेकांशी मेळ खाणाऱ्या असतीलच याची शाश्वती देता येत नाही. याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे लेखक अद्यस्थितीतल्या प्रत्येकाच्या मनात विकसित झालेल्या “मी” विषयी भाष्य करतो. हा अहं अराजकतेकडे घेऊन जाणारा आहे. प्रत्येकाला अॅप्रिसिएशन हवे आहे, टीका ही असह्य बाब असून तिच्यापासून फारकत घेतलेली पात्रे मंचावर जेव्हा एक आकृतीबंध निर्माण करतात तेव्हा कुठे हे नाटक अॅब्जर्डीजमकडे झुकलेय याचा साक्षात्कार होतो.
नव्या नाटककार तरुण पिढीने एक नाट्याभ्यास म्हणून “गोलकोंडा डायमंड्स” जरूर बघावे. सर्व कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. कौस्तुभ झालेले योगेश्वर बेंद्रे चक्रव्यूहात अडकलेल्या माणसाची तडफड उत्कटपणे व्यक्त करतात. एका कटकारस्थानाचे बळी ठरलेल्या व्यक्तीची तगमग, कोसळणं त्यांच्या आंगीक अभिनयातून व्यक्त झाली आहे. गंधर्वाच्या भूमिकेतील ओंकार मोरे यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा बळी ठरलेला माणूस त्याच्या सगळ्या यातनांसह साकारला आहे. गोष्ट सांगणारा म्हातारा उदित पाटील यांनी प्रभावीपणे मांडला. दहशतवादाचं प्रतीक असलेला एजंट ओंकार सातपुते यांनी स्टाईलाईज्ड पद्धतीने साकारलेला आहे. मायाचं मायावी रूप ऋतुजा शिंदे यांनी छानवठवलं आहे.
मंगेश महाजन यांचं संगीत आशयपूर्ण मात्र मयूर शिंदे या क्रिएटिव प्रकाशयोजनाकाराची करामत पत्रकार संघाच्या मर्यादित असलेल्या रंगमंचामुळे प्रभावीपणे अनुभवता आली नाही. सध्याच्या स्पर्धानाट्यात मयूर शिंदे हे कल्पकता असलेलं आघाडीचं नाव आहे, त्यामुळे त्याची प्रकाशयोजना ही परिपूर्ण रंगमंचावर नक्कीच प्रेक्षणीय असणार. प्रतीक्षा फडके यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. आजच्या गुंतागुंत वाढलेल्या सामाजिक परिस्थितीवर तितक्याच गुंतागुंतीचं भाष्य ‘गोळकोंडा डायमंड्स’ करतं त्यामुळे या नाटकातून निखळ मनोरंजन हा हेतू साध्य होईलच याबाबत मात्र मी साशंक आहे.

Comments
Add Comment

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’ राज चिंचणकर यंदा पावसाने मुंबईत बराच धुमाकूळ घातला आणि त्याचा परिणाम

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण युवराज अवसरमल आतली बातमी फुटली’ हा नवीन चित्रपट आलेला आहे. या

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

ती आई होती म्हणून...

पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची