
नवी मुंबई : बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी खेडकरचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला अटक केली असून, धुळे येथे लपून बसलेल्या साळुंखेला रबाले पोलिसांच्या टीमने बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर फरार होते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या दिशांनी तपासाचा धागा धरला. शेवटी, धुळे जिल्ह्यातून ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेचा ठावठिकाणा मिळाला आणि पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक करण्यात यश मिळवलं. दरम्यान, अद्याप दिलीप खेडकर फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या तीन विशेष टीम रवाना झाल्या आहेत. या कारवाईमुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपहरण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
सहाय्य पोलीस आयुक्त राहूल धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी चालक प्रफुल्ल साळुंखे याला धुळे जिल्ह्यातील सिंदखेड परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. यानंतर चौकशीदरम्यान प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्य आरोपी दिलीप खेडकर, त्यांची पत्नी मनोरमा खेडकर आणि आणखी एक अज्ञात आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या तीन विशेष पथकांना रवाना करण्यात आले आहे. मात्र, अपहरणासाठी वापरण्यात आलेली गाडी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही. या प्रकरणात सतत नव्या घडामोडी घडत असून, दिलीप खेडकर आणि इतर फरार आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रतिनिधी:भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीं चा तिसरा टप्पा शुक्रवारी न्यूझीलंडमधील क्वीन्सटाऊन येथे यशस्वीरित्या संपला. वाणिज्य ...
नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातानंतर थरारक अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सुमारे सव्वा सातच्या सुमारास मुलुंड–ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH १२ RP ५००० क्रमांकाची लँड क्रूझर यांचा जोरदार अपघात झाला. या अपघातानंतर घडलेल्या प्रकाराने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर लँड क्रूझरमधून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी थेट ट्रकवरील हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवून नेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने ट्रक चालक हादरून गेला. त्याने तात्काळ आपल्या मालक विलास ढेंगरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही घटना थेट रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार म्हणून नोंदवण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान MH १२ RP ५००० क्रमांकाची लँड क्रूझर पुण्यातील बाणेर परिसरातील एका बंगल्यासमोर उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी तपास पुढे नेला असता तो बंगला बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. या धक्कादायक उघडीनंतर पोलिसांची चौकशी अधिक गतीमान झाली. मात्र, पोलिसांची पावले पडताच दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर हे फरार झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या नवी मुंबई पोलिसांकडून या दोघांचा आणि या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
खेडकर दांपत्य बेपत्ता- मोबाईल फोन बंगल्यात ठेवून पलायन
दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या गायब होण्याभोवती नवे धागेदोरे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार, खेडकर दांपत्याने आपले मोबाईल फोन पुण्यातील बंगल्यात ठेवून पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. रबाळे पोलीस आणि पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस यांनी मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला असता, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे शेवटचे लोकेशन त्यांच्या बंगल्यातच आढळले. मात्र, पोलिसांनी बंगल्या आत जाऊन तपास केल्यानंतर दोन्ही मोबाईलचे लोकेशन अचानक बंद झाले. त्यामुळे खेडकर दांपत्य नेमके कुठे आहे, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतला आहे. परंतु दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे मोबाईल मात्र हाती लागलेले नाहीत. आणखी एक महत्त्वाचा तपशील म्हणजे, रबाळे येथे झालेल्या अपघातात वापरण्यात आलेली MH १२ RP ५००० क्रमांकांची लँड क्रूझर गाडी वगळता खेडकर कुटुंबातील इतर सर्व गाड्या बंगल्यातच पार्क केलेल्या आढळल्या आहेत. याशिवाय, मनोरमा खेडकर या कॅबमधून पळाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांच्या हालचाली अधिक गूढ स्वरूप घेत आहेत. पोलिसांच्या शोधमोहीमेला आता वेग आला असून, खेडकर दांपत्याचा शोध लागतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोरमा खेडकरचा पोलिसांवर कुत्रे सोडण्याचा प्रकार उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण प्रकरणातील तपासासाठी दिलीप खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर पोहोचलेल्या टीमला अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागला. पोलीसांनी घराचा दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास स्पष्ट नकार दिला. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी उलट घरातील कुत्रे पोलिसांवर सोडले, असा गंभीर दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. काही वेळाने, पोलिसांच्या दबावाखाली अपहरण पीडित प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, या गोंधळाचा फायदा घेत मुख्य आरोपी दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांचा खेडकर दांपत्याच्या शोधमोहीमेला अधिक वेग आला आहे.