Saturday, September 20, 2025

मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी

मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी

चेन्नई: मुंबईहून फुकेत, ​​थायलंडला जाणाऱ्या इंडिगोचे विमान 6E-1089 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे या विमानाचे शुक्रवारी रात्री उशिरा चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. त्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली, मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तु तिथे सापडली नाही. त्यानंतर ही एक खोटी धमकी असल्याचे आढळून आले. मात्र तरी सुद्धा यासंबंधित अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनने सांगितले की, दि. १९ सप्टेंबर रोजी मुंबईहून फुकेतला जाणारे इंडिगोचे विमान सुरक्षेच्या कारणांमुळे चेन्नईला वळवण्यात आले. प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि चेन्नईमध्ये विमानाची आवश्यक सुरक्षा तपासणी करण्यात आली.

मात्र, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली पाहायला मिळाली. प्रवाशांना चेन्नई विमानतळावर काही तस ताटकळत बसावे लागले होते. मात्र विमान प्रशासनाने ते ओळखून प्रवाशांना त्वरित अल्पोपहार सेवा आणि प्रत्येक माहिती वेळोवेळी सामायिक केली.

यापूर्वी, ६ सप्टेंबर रोजी, कोचीहून अबूधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे कोचीला परत यावे लागले. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी, इंडिगोचे विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबीसाठी रवाना झाले. उड्डाणानंतर सुमारे दोन तासांत तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर, सुरक्षेला प्राधान्य देत, वैमानिकाने उड्डाण कोचीला परत करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment