
सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या सहा महिन्यांत ४०.८१ लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे. २७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या ९,७०,२५,११९ वरून ९,८४,९६,६२६ इतकी झाली आहे. म्हणजेच एकूण १८,८०,५५३ नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान ४,०९,०४६ जुन्या मतदारांची नावे वगळण्यात आली असून, अंतिमतः एकूण १४,७१,५०७ मतदारांची वाढ झालेली आहे. गेल्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील आकडेवारीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी मात्र या नवीन वाढीव मतदारांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली नाही.
डिजिटल स्वरूपात मतदारयादी उपलब्ध नवीन मतदारयादी मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती, मात्र त्यावर कोणाच्या हरकती अद्याप आल्या नसल्याचेही समजते. नवीन मतदारयादी केंद्रीय निवडणूक कार्यालयाने आयोगाला मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 'डिजिटल' स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
घरबदलामुळेही मोठ्या प्रमाणावर नोंदणी या नव्या मतदारांपैकी १.९६ लाख मतदार हे घरबदलामुळे म्हणजेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे नव्याने नोंदले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे (३२,०३१), ठाणे (२७,३८६), आणि मुंबई उपनगर (२५,८३१) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.
सर्वाधिक मतदार वगळलेले पाच टॉपचे जिल्हे ठाणे : ४५ हजार ८००. मुंबई उपनगरे : ४४ हजार १७२. पुणे : ४३ हजार ९६१. नाशिक : ३५ हजार ४७९. जळगाव : २६ हजार ६३९. सर्वाधिक मतदार वाढलेले पाच टॉपचे जिल्हे ठाणे : २ लाख २५ हजार ८६६. पुणे : १ लाख ८२ हजार ४९०. पालघर : ९७ हजार १००. मुंबई उपनगरे : ९५ हजार ६३०. नागपूर : ७० हजार ६९३.
सर्वाधिक मतदार असलेले टॉपचे पाच जिल्हे पुणे : ९० लाख ३२ हजार ८०. मुंबई उपनगरे : ७७ हजार ८१ हजार ७२८. ठाणे : ७४ लाख ५५ हजार २०५. नाशिक : ५१ लाख २८ हजार ९७४. नागपूर : ४५ लाख ९६ हजार ६९०.