वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन जे काही निर्णय घेत आहे त्याचे प्रतिकूल परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असल्याचे मुडीजचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झांडी म्हणाले. टॅरिफ आणि इमिग्रेशन संदर्भात ट्रम्प प्रशासनाने जे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अमेरिकेची घडी विस्कटण्याचा धोका वाढला आहे. आर्थिक अस्थिरता लवकरच संकटाच्या रुपाने आदळण्याची चिन्ह आहेत, असे अर्थतज्ज्ञ मार्क झांडी म्हणाले.
ट्रम्प यांच्या सध्याच्या धोरणांमुळे अमेरिकेतली अनिश्चितता वाढली आहे. व्यावसायिक गुंतवणुकीचे अनेक निर्णय प्रलंबित आहेत किंवा रद्द झाले आहेत. काही निर्णयांमुळे अमेरिकेतील एक मोठा वर्ग ट्रम्प प्रशासनावर प्रचंड नाराज आहे. अमेरिकेतील बेकारी वाढत आहे. अद्याप मंदी आलेली नाही. पण लवकरच मंदी येण्याचा धोका आहे, अशी भीती अर्थतज्ज्ञ मार्क झांडी यांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक मंदीचे संकट कोसळले तर अमेरिकेत पुढील काही वर्षे रोजगार निर्मिती होणे कठीण आहे. फेड अर्थात फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अमेरिकेला दिलासा मिळेल. पण ट्रम्प यांची अनेक धोरणं अमेरिके पुढील आर्थिक आव्हानं बिकट करत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ मार्क झांडी यांनी व्यक्त केले. मंदीत अमेरिकेत असलेली कोणाचीही कोणतीही गुंतवणूक सुरक्षित नसेल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.