
जैतारण : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीच्या उत्तर प्रदेशमधील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज तपासल्यावर पोलिसांनी पाच आरोपींचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी पाच पैकी दोन अल्पवयीन असलेल्या आरोपींना अटक केली तर दोन आरोपी चकमकीत ठार झाले. एक आरोपी दुसऱ्या स्वतंत्र चकमकीत जखमी झाला.
आरोपी रामनिवास १९ वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अचूक माहिती मिळताच पोलिसांनी राजस्थानमधील ब्यावर जिल्ह्यातील जैतारण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनिवासचा शोध सुरू केला. अटकेच्या भीतीने रामनिवासने पळण्याच्या प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोळीबारात पायाला गोळी लागल्यामुळे रामनिवास जखमी झाला. पोलिसांनी रामनिवास सोबत अनिल नावाच्या आणखी एका गुन्हेगारालाही अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी .३२ बोरची पिस्तुल, चार जीवंत काडतुसे, .३१५ बोरचा गावठी कट्टा (गावठी अग्नीशस्त्र), दोन जीवंत काडतुसे, आठ पुंगळ्या जप्त केल्या.
हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविंद्र आणि अरुण हे आरोपी ठार झाले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली. तर रामनिवासला बरेली पोलिसांनी राजस्थानमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर अटक केली. रामनिवासकडून पोलिसांनी विना नंबरप्लेटची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त केली.