
वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक वस्तु आणि किंमती सामान जळून खाक झाल्याची माहिती सामोरी येत आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली.
वसई पूर्व येथील गिरीराज कॉम्प्लेक्स येथील चौथ्या मजल्यावर हा पुठ्ठा कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी अचानकपणे या कारखान्याला आग लागली होती. या आगीच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली. ज्यात लाखोंचा मुद्देमाल भस्मसात झाला. सकाळच्या प्रहरी अचानक लागलेल्या या आगीची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन आग विजवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला.
तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात
कारखान्यात मोठ्या प्रमाणात पुठ्ठे असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र यात कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.