
अबुधाबी: आशिया कप २०२५चा ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा सामना आज भारत आणि ओमान यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना अबुधाबीमध्ये रंगतोय.या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने ओमानला जिंकण्यासाठी १८९ धावांचे आव्हान दिले आहे.
भारताने या सामन्यात ओमानला विजयासाठी १८९ धावा हव्या आहेत. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८८ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल अवघ्या ५ धावा काढून बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने १५ चेंडूत ३८ धावांची वेगवान खेळी करत संघाला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरुवात दिली. त्यानंतर संजू सॅमसनने एक बाजू सांभाळत डाव सावरला. त्याने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताला मधल्या फळीत काही धक्के बसले. हार्दिक पांड्या (१), शिवम दुबे (५) स्वस्तात बाद झाले. मात्र, अक्षर पटेलने (१३ चेंडूत २६) आणि तिलक वर्मा (१८ चेंडूत २९) यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्येला गती दिली. शेवटच्या षटकांमध्ये हर्षित राणाने केलेल्या १३ धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला १९० च्या जवळ पोहोचता आले.टीम इंडियाने आधीच सुपर ४मध्ये स्थान बनवले आहे आणि पाकिस्तानविरुद्ध २१ सप्टेंबरला होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्याआधी हा सामना टीम मॅनेजमेंटसाठी योग्य ठरू शकतो. तर ओमानचा संघ आधीच बाहेर झाला आहे आणि या स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना आहे.
ओमानचा संघ या स्पर्धेत अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यांनी मागील सामन्यांमध्ये चांगला संघर्ष दाखवला आहे, परंतु त्यांना अनुभवी संघांपुढे मोठी धावसंख्या उभारण्यात किंवा कमी धावसंख्येवर प्रतिस्पर्धकांना रोखण्यात अपयश आले आहे. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. आजचा हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास असणार आहे. भारत आपली विजयी मालिका कायम ठेवणार की, ओमान काहीतरी चमत्कार करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.