
नागपूर: 'लोकांची कामे होणार नसतील, तर खुर्ची खाली करा,' असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. नागपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी कामचुकार मंत्र्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
एक दिवस पक्ष सांगतो त्यावेळी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. यापुढे जबाबदारी आल्यावर भान ठेवले पाहिजे. मंत्री महोदयांना पक्षापेक्षा काम जास्त असेल तर त्यांनी आपलं पद मोकळं करायला हरकत नाही. पालकमंत्री ज्यांना मिळाले आहे त्यांनी इतर दिवशी जावंच लागेल. आणि लोकांची कामे पूर्ण करा. लोकांची कामे होणार नसेल तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा वजा सज्जड दम अजितदादांनी जाहीरपणे बोलताना दिला.
चिंतन शिबिरातून 'नागपूर डिक्लेरेशन'
अजित पवार म्हणाले की, हे शिबिर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नसून, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. शिबिरातून तयार होणारा आराखडा 'नागपूर डिक्लेरेशन' म्हणून मांडला जाईल. यातून धाडसी आणि ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेला हेलपाटे मारायला लावू नका
अजित पवार यांनी सर्वधर्मसमभाव आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार पक्ष काम करत असल्याचे सांगितले. तसेच, 'सत्ता किंवा पदासाठी आम्ही महायुतीत सामील झालो नाही, तर राज्याची प्रगती व्हावी आणि ठोस निर्णय घेता यावा म्हणून आलो,' असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मंत्र्यांना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आवाहन केले. 'जनतेला हेलपाटे मारायला लावू नका,' असा थेट आदेश देत त्यांनी सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय अधिक घट्ट करण्याचे निर्देश दिले.
'जनसंवाद' मोहीम
पुढील काळात प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी जोडला जावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी जनसंवादाचा कार्यक्रम घेतला जाईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली. तसेच, दर महिन्याला नवीन मोहीम आणि विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.