
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना आता e-KYC करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
योजनेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अपात्र व्यक्तींनी या योजनेचा गैरवापर केल्याची माहिती समोर आल्यानंतर, सरकारकडून ही पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या e-KYC मुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर आळा बसणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/gBViSYZxcm या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 18, 2025
मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांच्या आत ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, पात्र महिलांनी नियमित लाभ मिळवण्यासाठी ती वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. e-KYC न करणाऱ्या महिलांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.