मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरी बरसू शकतात, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.
असे असेल मुंबईचे हवामान:
मुंबईत पुढील दोन-तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
राज्यातील इतर भागांचा अंदाज:
मध्य महाराष्ट्र: पुणे, नाशिक, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भ: विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना पावसाच्या तयारीने बाहेर पडावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता
शुक्रवारपासून राज्यभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील तर काही ठिकाणी अधून-मधून पाऊस कोसळू शकतो. दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, मोसमी वाऱ्यांनीही मंगळवारी काही भागातून माघार घेतली आहे.