
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून गेले असतानाच, आता सामान्य नागरिकांनाही टोळक्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोथरूड (Pune Kothrud) परिसरात निलेश घायवळ टोळीतील (Nilesh Ghywal Gang) सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर सरळसरळ गोळीबार केला. या घटनेत प्रकाश धुमाळ असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे कारण ऐकून आणखी धक्का बसतो गाडीला जाण्यासाठी धुमाळ यांनी वाट दिली नाही, एवढ्याच कारणावरून टोळीतील मयुर कुंभारे याने सरळ त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी धुमाळ जवळच्या इमारतीकडे धावले आणि त्यावेळी सचिन गोपाळघरे या स्थानिक नागरिकाने त्यांना मदत केली.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्याच जवळ कोथरूड पोलीस स्टेशन आहे. परंतु, अगदी हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पोलिस स्टेशन २०० मीटरवर, तरी पोहोचायला अर्धा तास
पुण्यातील कोथरूड परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सचिन गोपाळघरे यांनी सांगितले की, “आम्ही रात्री झोपायला जात होतो. अचानक आवाज आला. बाहेर पाहिलं तर चौघेजण तिथे बसलेले दिसले. काय झालं विचारलं असता त्यांनी सांगितलं, खाली फायरिंग झालं आहे, तुम्ही जाऊ नका. मी विचारलं कोणाला लागलं? तेव्हा त्यांनी सांगितलं, एका व्यक्तीच्या मानेला गोळी लागली आहे.” गोळी लागल्यानंतर जखमी प्रकाश धुमाळ यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारील इमारतीत आसरा घेतला आणि जवळपास अर्धा तास तेथे बसून राहिले. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणापासून कोथरूड पोलिस स्टेशन केवळ २०० मीटर अंतरावर आहे. सरळ चालत गेलं तरी अवघ्या दोन मिनिटांत तिथे पोहोचता येतं. मात्र प्रत्यक्षात पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला. ही घटना पोलिस स्टेशनच्या अगदी शेजारी घडली असताना एवढा उशीर का झाला? पोलिस नक्की कुठे होते? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा खरंच किती सक्षम आहे? असे अनेक प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड शहरातील एका भीषण अपघातामुळे (Accident) ...
पुण्यातील गुन्हेगारीवर कधी बसेल आळा? नागरिकांचा संताप
पोलिस स्टेशनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर झालेल्या या घटनेत प्रकाश धुमाळ या सर्वसामान्य व्यक्तीला तीन गोळ्या लागल्या. जीव वाचवण्यासाठी ते धडपडत जवळच्या इमारतीच्या दिशेने धावले आणि शेवटी एका पाण्याच्या टाकीवर चढून लपून बसले. या दरम्यान, स्थानिक नागरिक सचिन गोपाळघरे यांनी धैर्य दाखवत प्रकाश धुमाळ यांना पाणी दिलं आणि शक्य तितकी मदत केली. मात्र परिस्थिती अत्यंत भयानक होती, धुमाळ यांच्या शरीरातून सतत रक्त वाहत होतं, इमारतीभोवती रक्ताचे डाग आणि पायांचे ठसे स्पष्टपणे दिसत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर अर्धा तास उलटून गेल्यावरच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. जिथे ही घटना घडली ते ठिकाण पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ असताना एवढा उशीर का झाला, हा मोठा प्रश्न आहे. सर्वात गंभीर म्हणजे, टोळीशी कोणताही संबंध नसलेल्या, निर्दोष आणि सर्वसामान्य व्यक्तीवर असा गोळीबार होतोय यावरून पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत किती वाढली आहे हे स्पष्ट होतं. आता नागरिक विचारू लागले आहेत, पोलिसांची जरब खरंच उरली आहे का? आणि अशा टोळ्यांच्या कारवायांना एकदाच आळा घालून त्यांना कायमचं थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलली जाणार का?