Thursday, September 18, 2025

महर्षी पराशर

महर्षी पराशर

महर्षी पराशर

डॉ. अनुराधा कुलकर्णी

ग्वेदातील ९ अग्निसूक्ते महर्षी पराशरांची आहेत. त्या सूक्तांच्या एकूण ९१ ऋचा आहेत. छोट्या ठिणगीपासून महान ज्वाळेपर्यंत बदलत जाणारे अग्निदेवांचे चैतन्यदायी रूप त्यांना दिग्विजयी सम्राटासारखे मनोरम वाटत होते. आपल्या प्राणाला जागृत ठेवणारा अग्नी जोवर शरीरात आहे, तोवरच आपण जिवंत आहोत. या शरारांतर्गत असलेल्या अग्निरूपी यज्ञात अन्नाची सतत आहुती लागते आणि तो अग्नी प्रज्ज्वलित ठेवण्यासाठी कार्यशीलतेची गरज असते. तसेच ज्ञानरूपी अग्नीची ज्योतही आपल्या हृदयात असते, ती सर्वात्मकभावाने तेवत राहते, असे अग्निविषयक वेदमंत्रांचे पराशर ऋषींना दर्शन झाले. उत्तम अपत्यासाठी अग्नी महत्त्वाचा आहे, हे महर्षी पराशरांच्या ऋचेवरून कळते. आ यत् इषे नृपतिं तेजः आनट् शुचिः रेतः निषिक्तं द्यौः अभिके । अग्निः शर्धं अनवद्य युवानं स्वाध्यं जनयत् सूदयत् च ।।ऋ.मं१सू.७१.८ अग्निदेवांचे तेज मेघांमध्ये स्थापित झाल्याने पृथ्वीवर जलवर्षाव होतो. त्यातूनच अन्ननिर्मिती होऊन ते अग्नितेजानेच शिजवले जाऊन त्यात रसपरिपोष होतो. या अन्नाचे पचनही अग्निदेवांच्या वैश्वानर रूपाने होऊन मानवांना जीवनरस मिळतो, तीच पावन ऊर्जा रेतात संयुक्त होते. अग्निदेव त्या रेताची स्थापना मानवाच्या वृषणात करतात. योग्य आहार, विहार, अष्टांग योगादी तपस्येने या वीर्याचे पोषण झाल्यास बलवान, ओजयुक्त, अव्यंग, सुडौल अशा संततीला जन्म मिळतो. अग्निदेवांनी या संतानांना श्रेष्ठ कर्मात प्रेरित करावे, असे महर्षी पराशर म्हणतात. चेदीदेशाचे राजे उपरिचर वसू व त्यांच्या महाराणी गिरिकादेवी हे उत्तम संतानासाठी व्रत करीत होते. हे व्रत संपन्न झाले आणि आता राणीला प्राप्त होणाऱ्या ऋतुकालाचीच म्हणजे समागमासाठी असलेल्या योग्य काळाचीच प्रतीक्षा होती. त्याच समयी त्यांच्या राज्यातील वनाजवळील नगरात हिंस्र पशुंचा उपद्रव सुरू झाल्याने राजाला त्या प्राण्याच्या बंदोबस्तासाठी जावे लागले. बंदोबस्ताचे हे काम पूर्ण होत आले, त्यावेळी उपरिचरराजे अल्पकाळ एका झाडाखाली विसावा घेण्यासाठी बसले होते, त्यावेळी एका श्येन पक्ष्याद्वारे राणीचा निरोप आला की तिला ऋतुकाल प्राप्त झाला आहे, उपरिचर वसुराजाचे मन गिरिकाराणीशी पूर्ण रत झाले आणि त्यांचे वीर्यस्खलन झाले. हे वीर्य अमोघ आहे, हे राजाला ज्ञात असल्याने त्यांनी ते एका द्रोणात भरून त्यांनी श्येन पक्ष्याजवळ दिले व त्याला त्वरित राणीकडे जाण्यास सांगितले. श्येनपक्षी आपल्या चोचीत तो द्रोण घेऊन जात असता त्याला दुसऱ्या एका श्येन पक्ष्याने पाहिले. हा द्रोण म्हणजे काही खाद्यच आहे, असे समजून दुसऱ्या पक्ष्याने त्यावर झडप घातली. दोन्ही पक्ष्यांची झटापट सुरू झाली पण त्यात द्रोण कलंडून त्यातले वीर्य खाली नदीत पडले. ते नदीतल्या एका मासोळीने लगेच गिळले. एका दाशराज नावाच्या कोळ्याच्या जाळ्यात ही मासोळी सापडली. तिच्या उदरात कोळ्याला एक मुलगी मिळाली. तीच सत्यवती. सत्यवती विलक्षण सुंदर होती, तसेच कार्यतत्पर होती. कोळ्याच्या घरच्या सर्व कामात तिची मदत असल्याने तिच्या अंगाला माशांचा वास येत होता. ती यमुनानदीवर प्रवाशांना ऐलतीरावरून पैलतीरी नेण्याचेही काम करीत असे. पराशर एकदा सत्यवतीच्या नावेत बसून पैलतीरावर जात होते. सत्यवती निरपेक्ष कर्मसाधक आहे, हे त्यांच्या ध्यानी आले. त्यांना तिचा सहज कर्मयोग सुंदर वाटला. महर्षी पराशरांना आपली ज्ञानसाधना पुढे नेणारा पुत्र हवा होता. नौकानयन करणाऱ्या सत्यवतीला पाहून ही लोकोत्तर पुरुषाची माता होऊ शकेल, असा ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या पराशरांना विश्वास वाटला. महर्षी पराशरांनी सत्यवतीच्या संमतीने केवळ सत्यसंकल्पाचे बीज तिच्यात रुजविले. त्यावेळी जडत्वाचा संपर्क नसलेले धुके त्यांच्या नौकेभोवती होते. यमुनानदीतील एका द्विपावर अयोनीसंभवानेच सत्यवतीच्या पोटी व्यास जन्माला आले. या लोकविलक्षण संगाने सत्यवती माता बनूनही तिचे कौमार्य अभंग राहिले आणि ती मत्स्यगंधेची मधुरगंधा झाली. महर्षी पराशरांनी आपल्या जवळील सर्व विद्यांचे अध्ययन व्यासांकडून करवून घेतले. मुळातच दिव्य विद्यांचे तेज घेऊन आलेल्या पुत्राला त्याच्या पुढील युगप्रवर्तक कार्यासाठी सिद्ध केले. (उत्तरार्ध)

Comments
Add Comment