
या जगण्यावर, या जन्मावर...
प्राची परचुरे वैद्यजन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ हे गीत जगण्यावर प्रेम करायला शिकवतं. पण आजच्या काळात चित्रं उलटच दिसतं. वर्तमानपत्रात आपण बातमी वाचतो लोक सहज आत्महत्या करतात. माणूस जगण्यापेक्षा मरणाला जवळ करत आहे आणि यात सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. थेाडं काही मनासारखं झालं नाही की आपला मोलाचा जीव देतात. आपली मानसिक स्थिती इतकी कमजोर झाली आहे की, कोणी अरे म्हणायची देर आपण लगेच आपला मौल्यवान जीव द्यायला तयारच असतो. मनुष्य जन्म एकदाच मिळतो पण तो सार्थकी न लावता आपण आपलं जगणं वाया घालवत आहोत. जीव द्यायचाच झाला तर देशासाठी द्या. आपलं जीवन एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करा. कर्जबाजारी झाले म्हणून, परीक्षेत मार्कस कमी पडले म्हणून, कोणी रागवलं, मोबाइल दिला नाही म्हणून असे आणि किती कारणावरून आत्महत्या केल्या जातात. त्यांना सांगावसं वाटतं की पैसाच सर्व काही नाही किंवा मार्क्स हे सर्व काही नाही. दहावीला किती गुण मिळाले हे फक्त मार्कलिस्ट पुरते मर्यादित आहे. पण आपण आपल्या घरच्यांचा विचार न करता जीव देऊन मोकळे होतो. कोणासाठी कोणीही अडत नसतं; परंतु असं जरी असलं तरी आपल्यामागे आपल्या कुटुंबाचं काय होतं याचा विचारही आपण करत नाही. त्यांच्या मागे घर चालवते ती त्यांची बायको... तिला नसेल का कर्जाची, कुंटुंबाची चिंता? घरी गरिबी आहे. शेती केली तर निसर्ग साथ देत नाही, कर्जाचा डोंगर उभा आहे पण अशा सर्व परिस्थितीशी लढते ती शेतकऱ्याची बायको. नवरा नसेल पण आपल्या कुंटुंबाला वाऱ्यावर न सोडता ती सर्वांची काळजी घेते. परिस्थितीला दोन हात करून नेटाने पुन्हा उभी राहते, याला म्हणतात जगणे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे संघर्ष कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत नाही पण आपण मात्र परीक्षा देण्यापूर्वीच हरतो. ते म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. कोणत्याही मोठ्या व्यक्तीचं नाव घ्या त्यांना आलेले अपयश हेच त्यांच्या यशाचं कारण ठरलं आहे. डॉ. अब्दुल कलाम अथक परिश्रम करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाली. डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. स्टीव्ह जॉब्ज यांनी आपल्या अंपगत्वावर मात करून जगात आपलं नाव केलं. अगदी प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यालाही अथक मेहनत करावी लागली आहे. सहज अशी कोणतीच गोष्ट कोणालाच मिळत नाही. असे म्हणतातच, ‘प्रयत्नांती परमेश्वर’. सतत दु:खात राहिलो तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. माझ्याजवळ हे नाही माझ्याजवळ ते नाही... थोडं काही झालं की लगेच जीव द्यायला तयार. खरंच जीवन एवढं स्वस्त झालं आहे का? जीवन एकदाच मिळतं त्यामुळे जगण्याचा आनंद घ्या. स्वत:साठी जगा, आपल्या घरच्यांसाठी जगा. कधीतरी दुसऱ्यासाठी जगून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा, तुम्हाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाबा आमटे, अभय बंग यांच्याकडून जीवनाचा आदर्श घ्या. आपण त्यांच्याएवढं नाही पण थोडा प्रयत्न तरी करा. कधीही जीवन संपवण्याचा विचार मनात आला की रस्त्याच्या कडेला असणारे गरीब जीव बघा. जे उन्हा पावसात त्या रस्त्यावर राहतात. साधे छप्पर पण त्यांच्याजवळ नाही पण त्याही परिस्थितीत ते जगत आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल आपण किती सुखी आहोत आणि हेही लक्षात ठेवा संघर्ष त्यालाच करावा लागतो ज्यात क्षमता असते. संकटे आली तरी त्यातून हळूहळू मार्ग काढावा. सुखानंतर दु:ख तसेच दु:खानंतर सुख येतेच हा निसर्गाचा नियम आहेच. सगळे दिवस सारखे कसे असतील त्यामुळे आपण असं काहीतरी करावं की,आपल्या जगण्याचा इतरांनाही अभिमान वाटावा.