
लखनऊ: ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने शानदार शतक झळकावत टीम इंडिया 'अ'ला संकटातून बाहेर काढले. ऑस्ट्रेलिया 'अ'ने पहिल्या डावात ५३२ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघ सुरुवातीला अडचणीत सापडला होता. पण जुरेलच्या झुंजार खेळीमुळे भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताची अवस्था ४ बाद २२२ अशी झाली होती. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी पाचव्या विकेटसाठी १८१ धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला ४०० च्या पार पोहोचवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल १३२ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११३ धावांवर नाबाद होता, तर देवदत्त पडिक्कल ८६ धावांवर खेळत होता.
जुरेलने केवळ ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याची ही खेळी आक्रमक आणि संयमी अशा दोन्हीचा मिलाफ होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. दुसरीकडे, कर्णधार श्रेयस अय्यरला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो केवळ ८ धावा काढून बाद झाला.
या शतकी खेळीमुळे ध्रुव जुरेलची राष्ट्रीय संघात जागा पक्की होण्याची शक्यता वाढली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते, कारण ऋषभ पंत अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. जुरेलने यापूर्वीही भारतासाठी महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी केली आहे, आणि त्याच्या या कामगिरीमुळे निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.