
मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची लोकप्रियता इतकी वाढतेय की हा सिनेमा कमाईचे नवनवे उच्चांक गाठत आहे. बऱ्याच दिवसांनी एखाद्या मराठी सिनेमाचा डंका सिनेमागृहात वाजताना दिसतयो. हा सिनेमा बॉलिवूडच्या सिनेमांना तगडी टक्कर देतोय.
कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित ‘दशावतार’मध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका आहे. १२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी लांखोमध्ये या सिनेमाने कमाई केली. मात्र त्यानंतर या सिनेमाने कोटींचा आकडा धरला. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. पहिल्या वीकेंडमध्ये या सिनेमाने तब्बल ५.२२ कोटींची कमाई केली. त्यांनंतर सोमवारी चौथ्या दिवशी या सिनेमाने १.१ कोटी रूपये कमावले. मंगळवारी पाचव्या दिवशीही या सिनेमाने १.३ कोटी रूपयांची कमाई केली. Sacnilk ने याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांत या सिनेमाने ६.८ कोटींची कमाई केली आहे. बुधवारी या सिनेमाने १.३५ कोटींची कमाई केल्याची माहिती आहे. अजून बुधवारच्या कमाईचा अधिकृत आकडा येणे बाकी आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढूही शकतो. या सिनेमाची ही घोडदौड पाहता लवकरच हा सिनेमा १० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही.
दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या ८१व्या वर्षी या सिनेमात दमदार बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे. अनेक स्टंटही त्यांनी या सिनेमात स्वत: केले. त्यांच्यासोबत या सिनेमात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदुलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल यांनी भूमिका साकारल्या आहेत.