
मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आदर केला जातो. कारण कावळ्याला पितरांचे प्रतिनिधी मानले जाते. मात्र, यंदा मुंबईसह अन्य शहर परिसरात कावळ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याआधी चिमण्या नामशेष झाल्या. आता कावळे देखिल कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे पितृपक्षाच्या विधी करताना कावळ्यांच्या ऐवजी इतर पक्ष्यांना अन्न देण्याची गरज भासत आहे.
पर्यावरणातील असंतुलन, झाडतोड, वाढती नागरीकरण आणि रेडिएशन यामुळे कावळ्यांसह अनेक पक्ष्यांच्या निवासस्थानांचा नाश होतो आहे. प्राणीप्रेमी आणि पर्यावरणतज्ञांची चिंता वाढली आहे, कारण जर ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात कावळे केवळ आठवणीत आणि छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतील.
आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे. चिमणी, कावळा आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होणे म्हणजे पर्यावरणाचा असंतुलन वाढणे होय. आपण आपल्या परिसरातील झाडे व निसर्गाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी पदार्थ वापरणे टाळा. हे पदार्थ माती, पाणी आणि पर्यावरणासाठी घातक आहेत. तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण करतात.
पर्यायी, नैसर्गिक व सुरक्षित उपायांचा वापर करा, जेणेकरून पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा रक्षण होईल. प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून पितृपक्षाच्या या पवित्र काळात पूर्वजांना अभिमान वाटेल आणि निसर्गही समृद्ध होईल.
आपली लहानशी जबाबदारी बदल घडवू शकते. झाडे लावा, कचरापेटीचा योग्य वापर करा, आणि पर्यावरणाचा सन्मान करा.