मुंबई : मध्य मुंबईत दादर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून पुतळा विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी ही कृती केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच संपूर्ण दादरमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात पुतळ्यावर फेकण्यात आलेला रंग काढून पुतळा तसेच भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार घडल्याचे कळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाऊन पुतळ्याचे अवलोकन केले. उद्धव ठाकरे गटाने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भेकड्यांच्या औलादींना प्रत्युत्तर देऊ, असे राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई म्हणाले.
याआधी काही वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सत्तेत असताना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला विद्रूप करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी मुंबईत हिंसक घटना घडल्या होत्या. सार्वजनिक संपत्तीची हानी झाली होती. यामुळे पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहेत.