
१,७४,००० टेस्ला मॉडेल वाय कारची चौकशी सुरू!
नवी दिल्ली: हाय-टेक फीचर्स आणि तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या टेस्ला कारची सध्या देशभरात चर्चा आहे. याचे कारण म्हणजे, टेस्लाच्या मॉडेल वायचे भारतीय बाजारात नुकतेच लाँचिंग करण्यात आले. या कारची भारतात किंमत ₹५९.८९ लाख पासून सुरू होते. ज्याची खरेदी अनेक राजकारणी आणि उद्योगजकांनी घेतल्याच्या चर्चा देखील होत आहे. पण याबरोबरच टेस्लाच्या या नव्या मॉडेलच्या सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत, खास करून बाल सुरक्षिततेबाबत टेस्लावर प्रश्न उपस्थित केला जात असल्यामुळे, यूएस ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी एजन्सी (NHTSA) ने अंदाजे १.७४ लाख टेस्ला मॉडेल वाय कारच्या चौकशीला सुरूवात केली आहे.
एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. कारण अमेरिकेत या कारसंबंधित अनेक नकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अमेरिकेतील अनेक पालकांना त्यांच्या मुलांना टेस्ला कारमधून बाहेर काढण्यासाठी चक्क काचा फोडाव्या लागल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता अमेरिकन ट्रॅफिक सेफ्टी एजन्सी, NHTSA पर्यंत पोहोचले आहे. त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक डोअर हँडलमध्ये बिघाड झाल्याचे कारण देत एजन्सीने १,७४,००० मॉडेल वाय कारची चौकशी सुरू केली आहे.
इलेक्ट्रॉनिक डोअर हँडल काम करणे बंद होत असल्याची तक्रार
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेची वाहतूक सुरक्षा संस्था, नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने २०२१ मध्ये उत्पादित केलेल्या अंदाजे १,७४,००० टेस्ला मॉडेल वाय कारची चौकशी सुरू केली आहे. या टेस्ला कारवरील इलेक्ट्रॉनिक डोअर हँडल अचानक काम करणे बंद होतात अशा तक्रारींनंतर प्रशासनाने ही कारवाई केली.
बाल सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न
एजन्सीला मिळालेल्या तक्रारींमध्ये, अमेरिकेतील अनेक पालकांनी असा दावा केला आहे की वाहनातून बाहेर पडल्यानंतर, जेव्हा ते त्यांच्या मुलांना मागच्या सीटवरून बाहेर काढण्यासाठी किंवा आत बसवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारचा हँडल अचानक काम करणे बंद झाला होता.
NHTSA ने आतापर्यंत एकूण नऊ प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात कारचे दरवाजेच उघडले नाहीत. यामधील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी चार प्रकरणांमध्ये, पालकांना आपल्या लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी कारची खिडकी तोडावी लागली.
या प्रकरणी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, इलेक्ट्रॉनिक डोअर लॉकना वाहनातून पुरेसा व्होल्टेज मिळत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. अहवालांनुसार, अनेक प्रकरणांमध्ये, कमी व्होल्टेजच्या बॅटरी बदलाव्या लागल्या, परंतु कार मालकांना बॅटरीशी संबंधित कोणत्याही पूर्वसूचना कधीच मिळाल्या नाहीत. चिंतेची बाब म्हणजे, टेस्ला वाहनांमध्ये मॅन्युअल डोअर रिलीज पर्याय जरी असला तरी, लहान मुले तो वापरू शकत नाहीत. या दोषामुळे खास लहान मुलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
यासंबंधित, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाद्वारे टेस्लाचे प्रारंभिक मूल्यांकन जात आहे. त्यात जर एजन्सीने असे ठरवले की हा दोष प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे, तर ते मॉडेल परत मागवण्याची शिफारस करू शकतात. हे प्रकरण केवळ टेस्लासाठीच नाही तर संपूर्ण इलेक्ट्रिक कार उद्योगासाठी एक इशाराच आहे., की उच्च-तंत्रज्ञानाच्या वैशिष्ट्यांचा पाठलाग करताना मूलभूत सुरक्षिततेशी तडजोड केली जाऊ नये.