नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली. 'बिहारमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या एसआयआरला विरोध म्हणून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यात्रा काढली. यात्रेद्वारे निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध केला. नेमक्या शब्दात सांगायचं तर राहुल गांधींनी बिहारमध्ये घुसखोर वाचवा यात्रा काढली. काँग्रेसला मतांसाठी भारतीयांवर विश्वास नाही, ते घुसखोरांवर विसंबून आहेत. यासाठी त्यांना देशात घुसखोर हवे आहेत. काँग्रेस घुसखोरांना वाचवत आहे;' असा घणाघात अमित शाह यांनी केला.
मतं मिळावी यासाठी काँग्रेसला भारताच्या मतदारयादीत घुसखोर हवे आहेत. ते घुसखोरांच्या बळावर निवडणुका जिंकू इच्छितात. तर भाजप एसआयआर आणि मतदार याद्या स्वच्छ करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देत आहे. भारताची सुरक्षा, एकात्मता आणि विकास याला भाजप प्राधान्य देते आणि देणार. मोदी सरकारने आतापर्यंत ११ वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा,भारताचा विकास, मतदार यादी सुधारणा, कलम ३७० या विषयांना प्राधान्य दिले. भारताच्या अर्थचक्राला गती दिली. देशाचा वेगाने विकास करण्याला भर दिला. जीएसटीद्वारे कर व्यवस्था आधुनिक तसेच सोपी केली. जीएसटी सवलतींद्वारे सामान्यांना दिलासा दिला. देशाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळी आणि पारदर्शक अशी चर्चा केली; असेही अमित शाह म्हणाले.
मित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात लष्कराने पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. घुसखोरीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांशी चर्चा केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, सोमनाथ मंदिराचा विकास आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर असे ऐतिहासिक प्रकल्प केले.
काश्मीरमधून कलम ३७० हटवणे हा भाजपचा दीर्घकाळचा संकल्प होता, जो मोदी सरकारने पूर्ण केला आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय ऐतिहासिक होता आणि देशाची अखंडता मजबूत करणारा होता. मोदी सरकार कायमच भारताची सुरक्षा, एकात्मता आणि विकास यासाठी काम करत आहे आणि करत राहणार; असे अमित शाह म्हणाले.