मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील शिवाजी पार्कमधील पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने पुतळ्यावर लाल रंग फेकला होता. दरम्यान, हा आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे.
मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीचे नाव उपेंद्र पावसकर असल्याची माहिती असून त्याने गुन्हा कबूल केला असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.
शिवाजी पार्क येथील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचे प्रकरण घडले होते. यावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. शिवसैनिकांनी अत्यंत कठोर शब्दात याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी आरोपीच्या अटकेची तातडीने मागणी केली होती.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आरोपीला २४ तासांता बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंनीही या प्रकरणावर तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे म्हटले होते. ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते. कुणीतरी लावारिस माणसाने हे केलं असेल. बिहारमध्ये जसा मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग हा असू शकेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना निषेधार्थ असल्याचेम्हटले होते. ज्या समाजकंटकाने हा प्रकार केला. त्याला पोलीस नक्की शोधतील. मात्र याला कोणताही राजकीय रंग दिला जाऊ नये अशी प्रतिक्रिया दिली होती.