मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या आजाराच्मा रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात ५१८२ मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते, तर मंदा जानेवारी ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीतच ६२७७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील या वाढत्या रुग्णांमुळे मुंबई तापल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाने पावसाळा जन्प आजारांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार मलेरिया आणि चिकुनगुनिया आणि हिपॅटायटीस ए आणि ई या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार १ ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये ४ लाख ७४ हजार ४५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून २२ लाख ७३ हजार ५२१ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ८३ हजार २२८ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले आहे. ४४ हजार ६२५ नागरिकांची लेप्टोस्पायरोसीस प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहे, तर मलेरिया नियंत्रणानुसार २५ हजार ३६३ डासांच्या दृष्टिकोनातून तपासणी करण्यात आली आणि त्यात १६७८ डासांचे अड्डे आढळून आले असल्याची महिती कीटकनाशक विभागाने दिली आहे.
महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधी दरम्यान मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत असले तरी तरी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान या आजारांच्या रुग्णसंख्येत घट नोंदवली गेली आहे. हा कल २०२४मधील स्थितीशी सुसंगत आहे. जलजन्य आजारांमध्ये कोणतीही वाढ आढळून आलेली नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
काय घ्याल काळजी
मलेरिया, डेग्यू, चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी आपल्या घरामध्ये घराच्या अजुबाजूला व इमारतीच्या परिसरात कुठेही
पाणी साचलेले असणार नाही याची काळजी घ्यावी, ताप आल्यास जवळच्या महापालिका दवाखान्यात त्वरीत संपर्क साधावा,
लेप्टोस्पायरोसीस प्रतिबंधासाठी मुसळधार पावसात उघड्या पायाने चालणे टाळा, साचलेल्या पावसाच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रोगप्रतिबंधक उपचार घ्यावे
गॅस्ट्रो हिपॅटायटीस, टायफॉईड आजाराच्या प्रतिबंधासाठी रस्त्यावरील उघडे अन्न टाळा, जेवणापूर्वी हात धुवा किया हँड सॅनिटायझर वापरा तसेच पाणी उकळून प्याये