
नवी मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या व्यापाराला पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असले तरी, भारतात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी होत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अलीकडेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने दुबईमार्गे भारतात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. ही तस्करी जेएनपीटी बंदरावर केली जात होती.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडत असताना, काही लोकं अधिकाऱ्यांचे लक्ष चुकवून दुबईमार्गे पाकिस्तानी वस्तू आयात करून कोट्यवधी रुपयांचा व्यापार करत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
मुंबईस्थित महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने जेएनपीटी बंदरावर मोठी कारवाई केली आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत, १२ कोटी रुपयांच्या सौंदर्य प्रसाधने आणि सुक्या खजूरांनी भरलेले २८ कंटेनर जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
भारत सरकारकडून पाकिस्तानमध्ये आयात बंदी
भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे. त्यानंतर, डीआरआयने 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतात येणाऱ्या वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
भारतातून पाकिस्तानला बेकायदेशीर मार्गांनी पैसे पाठवले जात होते
हाती आलेल्या माहितीनुसार, दुबईस्थित हा पुरवठादार कमिशनवर काम करत होता आणि त्याच्या कंपन्यांचा वापर बेकायदेशीर मार्गांनी भारतातून पाकिस्तानला पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जात होता. भारत सरकारच्या कठोर योजना असूनही, मूळ देशाबद्दल खोटी माहिती आणि आणि खोट्या शिपिंग कागदपत्राद्वारे फसव्या शिपमेंट अद्याप सुरूच आहेत. म्हणूनच, यावर कठोर कायदे आणि अंमलबजावणीची मागणी आता जोर धरत आहे.