मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विशेष उपक्रमांतर्गत ७५ दुर्मिळ वृक्षांची लागवड केली त्यामध्ये कारपा, हुम्ब, वटसोल, सफेद धूप, चांदकुडा, उपास, तांबडा कुडा, आंबेरी, तिरफळ, मिरची कंद, फणशी, कडवा शिरीड, गोरखचिंच, कुमकुम, चारोळी, नांद्रूक, खडक पायर, दातीर, नागकेशर, सप्तरंगी, रानजांभूळ, समुद्रशिंगी, शेरस, रानबिबा, काळा धूप, वारंग अशा अनेक दुर्मीळ व स्थानिक प्रजातींचा समावेश आहे.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या वैविध्यपूर्ण भारतात वैविध्यतेची संकल्पना जैवविविधतेतून आली आहे. मूळ भारतीय प्रजातीचे प्रत्येक झाड कुठल्या न कुठल्या जैविक घटकाला अन्न, निवारा व आपली पुढची पिढी वाढविण्यासाठी हक्काची ठिकाणे देतात म्हणून या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले.मोदींच्या वाढदिवशी लावलेल्या वृक्षांपैकी काही झाडे कीटक व फुलपाखरांना आधार देणारी आहेत. काही झाडे पक्ष्यांना, तर काही झाडे छोट्या प्राण्यांना आधार देणारी आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी दुर्मिळ अशा सह्याद्रीच्या स्थानिक प्रजातींची ७५ झाडे लावणे व जैवविविधता सांभाळणे, अशी या वृक्षलागवडीमागची संकल्पना आहे. ही रोपे झाडे होतील व त्या झाडांचे वृक्ष होतील. वन्यजीवांच्या अनेक पिढ्या या वृक्षांचे लाभार्थी असतील. मोदींनी घडविलेला नवा भारतही त्याच्या पुढच्या पिढ्यांसह अशाच प्रकारे वर्षानुवर्षे त्यांच्या कार्याचा लाभ घेत राहील, अशा भावना यावेळी पालकमंत्री शेलार यांनी व्यक्त केल्या.