
मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व युनिव्हर्सिटी - वळणई मीठ चौकी” असे करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले.
या समारंभात बोलताना पीयूष गोयल यांनी अथर्व युनिव्हर्सिटीचे संस्थापक व कुलापती सुनील राणे यांचे अभिनंदन करत सांगितले, मी अथर्व ग्रुपचे अभिनंदन करतो. यंदा संस्थेला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी हे मेट्रो स्थानक दत्तक घेतले आहे. यामुळे लाखो प्रवाशांना संस्थेची ओळख होईल आणि तरुणाईला शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले की, अथर्व युनिव्हर्सिटीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारी सुविधा उपलब्ध आहे. कौशल्य विकासासाठी ही संस्था मोलाचे कार्य करते.
या नामकरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पीयूष गोयल उपस्थित होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर अथर्व युनिव्हर्सिटीचे कुलपती सुनील राणे, उपाध्यक्षा वर्षा राणे, साईन पोस्ट इंडियाचे श्रीपाद अष्टेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.