
नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी स्नॅक्सची रेसिपी आहे, ज्यामध्ये मुरमुरे, पोहे, कच्चे शेंगदाणे, फुटाणे डाळ, हिरवी मिरची आणि तेलासारखे पदार्थ मिसळून चटकदार चिवडा तयार केला जातो. यामध्ये कोणतेही तळलेले साहित्य नसले तरी तो चवीला खूप स्वादिष्ट असतो. आता नागपूरमध्ये याचा विश्वविक्रम करण्यात आला.
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी तब्बल तीनवेळा झुंज दिल्यानंतरही हार न मानणाऱ्या नीता अंजनकर यांनी पुन्हा एकदा विक्रम केला आहे. प्रसिद्ध मास्टर शेफ आणि कॅन्सर वॉरियर नीता अंजनकर यांनी ५६४ किलो कच्चा चिवडा बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. या आधी त्यांनी १००० किलोची आंबील बनवून विक्रम केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या जिद्दीचा, संघर्षांचा आणि अचाट आत्मविश्वासाचा अनोखा प्रत्यय दिला आहे.
हा विक्रम रचण्यापूर्वी फक्त आठवडाभर आधीच त्यांच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. तरीही त्यांनी न डगमगता, न थांबता हा चिवडा तयार केला. त्यांनी कच्चा चिवडा तयार करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नागपूर येथे पार पडला. या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सरवर मात करून पाककलेच्या विश्वात नवा अध्याय लिहिणाऱ्या प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी विदर्भाचे वैशिष्ट्य असलेल्या कच्चा चिवडा मोठ्या कढईत तयार करून विश्वविक्रम प्रस्थापित करून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली. यानिमित्त एशिया बुक रेकॉर्ड अडज्यूकेटर सुनीता धोटे व निखिलेश सावरकर यांच्या हस्ते त्यांच्या विक्रमाचा गौरव करण्यात आला. हा चिवडा वर्धा रोडवरील संचेती स्कूलच्या प्रांगणात बनवण्यात आला. जिथे अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या विक्रमाला साक्षीदार होण्याचा मान मिळवला.