रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व वायू प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आणि नव्या विस्तारलेल्या निवासी भागांमध्ये रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने सोडण्यात येत आहेत. या प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडली आहे असा सूर स्थानिकांचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) वारंवार तक्रारी देऊनसुद्धा केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
बदलापूर शहरातही औद्योगिक वसाहतींमधून सोडला जाणारा रासायनिक वायू नागरिकांच्या जीवावर उठला आहे. काही वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती स्थायिक झाली. नैसर्गिक नाल्यांमध्ये प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जाते. कंपनीतून रासायनिक वायू हवेत सोडला जातो. अनेक वर्षांपासून येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद होते. त्यात प्रक्रिया केली जात नसल्याची ओरड होती. अद्यापही त्यावर ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही.
एमआयडीसीमध्ये शेकडो रासायनिक कंपन्या :
अंबरनाथमध्ये आनंद नगर, मोरीवली आणि वडोली या तीन तर बदलापुरात खरवई येथे औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आहेत. या भागात शेकडो रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. पंधरवड्यापूर्वीच चिखलोली धरणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले होते. ज्यामुळे धरणातील पाणी दूषित होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. दुसरीकडे, मोरीवली, वडोली आणि बदलापुरातील खरवई भागातील कंपन्या मोठ्या प्रमाणात रासायनिक धुर सोडत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वसनविकार होत आहे.
दारे खिडक्या बंद ठेवाव्या लागतात :
अंबरनाथच्या बी कॅबिन, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी तसेच बदलापुरातील पूर्वेतील विविध भागातील रहिवाशांना रासायनिक वायूंच्या प्रचंड प्रदूषणामुळे दारे-खिडक्या बंद ठेवून राहावे लागत आहे. गर्भवती महिला, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका सहन करत आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी, कंपन्यांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
मोरीवली औद्योगिक वसाहतनजीक परिसरात तीन नामांकित शाळा असून येथे हजारों विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा रासायनिक कंपन्यांपासून जवळ असल्याने, प्रदूषणाचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाणी व वायू प्रदूषणाचा प्रश्न उग्र बनला आहे. या कंपन्या बिनधास्त प्रदूषण करत आहेत. याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी जयंत कदम यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.