
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवास अधिक स्वस्त आणि सुलभ होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.
इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीचे भाडेदर :
प्रारंभिक १.५ किलोमीटरसाठी ₹१५ , त्यानंतर प्रत्येक किमीला ₹१०.२७ आकारले जाणार आहे . हे दर ई-बाईकसाठीच लागू होतील.
ही सेवा ओला, उबर आणि रॅपिडो या मोठ्या मोबिलिटी कंपन्यांना तात्पुरत्या परवान्यांद्वारे मंजूर करण्यात आली आहे. स्मार्ट-राईड या चौथ्या कंपनीला अटी पूर्ण न केल्यामुळे मंजुरी नाकारण्यात आली आहे.
नियमावली व परवाने
महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ नुसार कंपन्यांना पुढील महिन्यात कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
हा निर्णय १८ ऑगस्ट रोजी राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्व नियम आणि अटींचे पालन आवश्यक आहे.
मुंबईत सध्या काळी-पिवळी टॅक्सीची सुरुवातीची भाडेवाढ ₹३१, तर ऑटो रिक्षासाठी ₹२६ आहे. त्यामानाने बाईक टॅक्सीची सेवा कमी दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे .
कोणत्या शहरांमध्ये मिळणार ई-बाईक टॅक्सी सेवा ?
राज्य सरकारने ठराव जाहीर करून जिथे लोकसंख्या १ लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ही सुविधा फक्त मुंबईपुरती मर्यादित न राहता, इतर मोठ्या शहरांमध्येही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.