
मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. त्यातच आज भाजप पक्षाने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.
तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महापौर हा महायुतीचाच असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नुकतीच मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचा फडणवीस यांनी यावेळी दाखला दिला. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.
काहीही झाले तर महायुतीचाच महापौर
२०२४मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आम्ही आणून दाखवले. महापालिकेच्या निवडणुकीतही पुन्हा महायुतीचे सरकारच येणार. काहीही झाले तर महायुतीचाच महापौर केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.
निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला
काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंचा पराभव झाला होता. आमच्या उमेदवारांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. लक्षात ठेवा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते. मात्र तुम्ही नाहीत. केवळ नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. आमच्या पक्षातील परंपरा बघा. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही तर अमित साटम हे सामान्य कार्यकर्ते मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी. असे फडणवीस यावेळी म्हणाले.