
मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून प्रवाशांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मेट्रो प्राधिकरणातर्फे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून पहिल्या गाड्या, आरे जेव्हीएलआर आणि आचार्य अत्रे चौक येथून सकाळी ५.५५ वाजता सुटतील. यापूर्वी या मेट्रो सकाळी ६.३० वाजता सुटत होत्या. यासह शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटेल.
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो ३ मार्गिकेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो-३ ची सेवा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना सकाळी ६.३० ऐवजी ५.५५ वाजल्यापासून प्रवासाला सुरुवात करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर ७ सप्टेंबरपासून मात्र नियमित वेळेनुसार म्हणजेच सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेतच मेट्रो सेवा सुरू होती. या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.