नवरात्र म्हणजे केवळ देवीची उपासना नाही, तर भारताच्या संस्कृतीचा एक भव्य उत्सव आहे. प्रत्येक राज्यात हा सण वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या रंगात, आणि वेगळ्या प्रकाराने साजरा केला जातो. देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना हे या सणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे, पण त्याबरोबरच नृत्य, संगीत, सजावट, व्रत, उपवास, आणि कलेचा संगमही यामध्ये दिसून येतो.
गुजरात
गुजरातमध्ये नवरात्र म्हटलं की लगेच गरबा आणि दांडियाची आठवण होते. संध्याकाळी महिलांनी परिधान केलेले रंगीबेरंगी घागरे, मिरर वर्क चोळ्या आणि पारंपरिक वाद्यांसह गरबा सत्र रंगात येतो. गुजरातमध्ये गरबा हे देवी दुर्गेच्या स्तुतीचं प्रतीक मानलं जातं.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात नवरात्राची सुरुवात घटस्थापनेने होते. देवीचे घट पूजन, रोज वेगळ्या रंगाचे कपडे, आणि महिलांसाठी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. काही भागात लोक गरबा, दांडिया खेळूनसुद्धा साजरे करतात.
पश्चिम बंगाल
बंगालमध्ये नवरात्र म्हणजे दुर्गा पूजेचा भव्य सोहळाच असतो. शष्ठी ते विजयादशमी पर्यंत, सुंदर मूर्तींची मांडणी, कलात्मक पंडाल्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे हा सण अत्यंत भव्यतेने साजरा केला जातो. सिंदूर खेला हा महिलांचा खास कार्यक्रम विजयादशमीच्या दिवशी होतो.
उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार
या ठिकाणी नवरात्रीत रामलीलाचे सादरीकरण केले जाते. प्रत्येक रात्री रामायणाच्या कथा रंगमंचावर सादर होतात आणि दसऱ्याला रावण, कुंभकर्ण आणि मेघनादाचे दहन केले जाते.
पंजाब आणि हरियाणा
नवरात्रीत उपवास व व्रत पाळले जातात. नवव्या दिवशी कन्या पूजन करून लहान मुलींना भोजन दिलं जातं. रात्री देवीचे जागरण होऊन संपूर्ण रात्र भजन-कीर्तन चालते.
तामिळनाडू, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगणा व केरळ
तामिळनाडू व कर्नाटका येथे "गोलू" म्हणून देवतांच्या मूर्तींची पायऱ्यांवर मांडणी केली जाते. तेलंगणा व आंध्रप्रदेश येथे बथुकम्मा नावाचा फुलांचा सण साजरा केला जातो यात महिलांच्या पारंपरिक नृत्याचा देखील समावेश असतो. केरळमध्ये नवरात्रीचा शेवट सरस्वती पूजन व विद्यारंभम ने होतो. येथे मुलांना पहिल्यांदा लिहायला शिकवतात.
या सर्व राज्यातील नवरात्रीचा उत्सव आणि उल्हास पाहता भारताची सांस्कृतिक वैविध्यता दिसून येते.