Thursday, September 18, 2025

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभर राबवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हे अभियान हाती घेण्यात आले असून, “सेवा ही संकल्प, राष्ट्र प्रगती ही प्रेरणा” या भावनेतून आरोग्य उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

तसेच आठवा राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम 17.9.25 ते 16.10.25 हा आरोग्य विभागाच्या समन्वयातून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सोबतच सर्व अंगणवाडी केंद्रात घेण्यात येणार आहे. यातील मुख्य विषय लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य आहार पद्धती, पोषण भी पढाई भी, बालक योग्य आहार पद्धती, पुरुषांचा बालसंगोपनात सहभाग, यासाठी अंगणवाडी स्तरावर पूरक आहार पाककृती प्रदर्शन, महिला बालक आरोग्य तपासणी, पोषण शपथ, स्थानिक आहाराचा समावेश, ॲनिमिया बाबत जागृती असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.

महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागामार्फत अभियान राबविण्यात येईल. महिलांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. यात रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर तपासणी (स्तन, गर्भाशय व तोंड), गर्भवतींची प्रसूतीपूर्व तपासणी, क्षयरोग तपासणी, एचआयव्ही तपासणी, दंत तपासणी, टीबी, सिकल सेल, ऍनिमिया यांसह अनेक तपासण्या मोफत करण्यात येतील.

सरकारने यावेळी मातृ व शिशु संरक्षण कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या सेवांचे नामांकन आणि नोंदणीची सोय सुलभ केली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांनी दिली आहे.

महिलांनी आणि मुलांनी या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या आयुष्मान आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा