Tuesday, September 16, 2025

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश

ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक घेऊन, घोडबंदर रस्त्यावर रात्री बारानंतरच जड वाहने सोडण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले. तसेच जर असे केले नाही, आणि बाराच्या पूर्वी वाहने बाहेर काढली तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले.

जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी अवजड वाहने रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना शिंदेंनी दिल्या.  तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त काकडे यांना सांगितले. त्याचबरोबर मीरा भायंदरचे पोलिस आयुक्त निकीत कौशिक, मीरा भायंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांना दूरध्वनीवरून अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री १२ वाजल्यानंतर सोडण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे असे सांगितले. या सर्व यंत्रणाच्या समन्वयाची जबाबदारी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्यावर सोपविली असून यामध्ये वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यांची या त्रासातून मुक्तता करणे हे अतिशय महत्वाचे असून घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मीरा भायंदर पोलिस आयुक्त, मीरा भायंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलिस शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट, पोलिस उप आयुक्त प्रशांत कदम आणि जस्टीस फॅार घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील आणि अ‍ॅड. राधिका राणे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment