मराठी साहित्याचा विश्वास

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड यंदा बहुमताने करण्यात आली. साहित्यिकांच्या सरकारी पैशाने मिरवण्याचा उत्सव असे जे स्वरूप या उत्सवाला आले होते त्याला यंदा विश्वास पाटील यांच्यासारख्या समर्थ साहित्यिक आणि कादंबरीकाराच्या निवडीमुळे छेद दिला गेला, असे म्हणावे लागेल. विश्वास पाटील हे नाव साहित्य जगतात आदराने घेतले जाते. ते सनदी अधिकारी तर होतेच पण 'पानिपत', 'महानायक' आणि 'झाडाझडती' सारख्या काही प्रचंड गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखकही आहेत. त्यामुळे साहित्यिक म्हणून त्यांचा दरारा कायम आहे. यापूर्वी काही अध्यक्ष होऊन गेले. मध्यंतरी साहित्य संमेलने नकोतच असे म्हणणारा गट निर्माण झाला होता. पण संमेलनं चालू आहेत. विश्वास पाटील यांच्याबाबतीत त्यांचे प्रत्येक लेखन हे आदरास पात्र असते. भले ते कुणाला आवडो अथवा न आवडो पण साहित्यिक म्हणून त्यांचे मूल्यमापन करता येईल. त्यादृष्टीने विश्वास पाटील यांची निवड ही अत्यंत योग्य आहे. साताऱ्यासारख्या शहरात होणाऱ्या संमेलनात ती यथार्थ आहे. साहित्य संमेलन आणि वाद काही नवे नाही. अगदी पहिल्या संमेलनात म्हणजे १८७८ साली झालेल्या साहित्य संमेलनात वाद गाजला होता, तो म्हणजे तेव्हाचे वंचितांचे पुढारी महात्मा जोतिबा फुले यांना आमंत्रण देऊनही ते स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता आणि त्यामुळे हा वाद गाजला होता. १९७५ च्या साहित्य संमेलनात तर दुर्गा भागवत यांनी मंत्री यशवतराव चव्हाण यांना व्यासपीठावर बसण्यास मनाई केली होती. त्यामुळे यशवंतराव तेव्हा सभागृहात बसले होते. साहित्य समेलनांना वादाची पार्श्वभूमी आहे. यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनात सरकारी हस्तक्षेपामुळे संमेलनच नको म्हणू्न ते गाजले होते. याला अपवाद गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनाचाही करता येणार नाही. कारण त्या संमेलनात सरकारी हस्तक्षेप सरळ सरळ दिसत होता. सरकारी हस्तक्षेपास कुणाचाच विरोध नाही, पण त्यालाही एक मर्यादा हवी. पण साहित्यिकच आपल्या माना जर राजकारण्याच्या हातात देणार असतील तर मग त्यांना दोष देता येणार नाही. आजवर असेच होत आले आहे. दुर्गा भागवतांसारखे अपवाद सोडले तर बरेचसे साहित्यिक सरकारपुढे नांग्या टाकणारे ठरले आहेत. विश्वास पाटील यांच्याबाबतीत तसे म्हणता येणार नाही. सरकारपुढे नांग्या टाकू नका. याचा अर्थ नेहमीच त्यांच्याविरोधात तलवारी उपसून बसा असेही नाही. पण योग्य वेळी आपला स्वाभिमान दाखवला पाहिजे.


विश्वास पाटील यांनी सरकारी नोकरी करताना वेळोवेळी तसा स्वाभिमान दाखवला आहे; परंतु विश्वास पाटील यांच्याबाबतीत असे वाद होण्याची शक्यता दिसत नाही, कारण त्यांचे साहित्यिक स्थान आज प्रचंड उंच आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. शिवाय विश्वास पाटील यांची निवड एकमताने झाली आहे. मुख्य प्रश्न हा आहे, की मराठी साहित्य वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि मराठी वाचन तर हल्ली दुर्मीळच झाले आहे. त्याबाबतीत विश्वास पाटील हे काही तरी करू शकतील. त्यांनीच सांगितले आहे, की नुसते एक गाव वाचनालयाचे म्हणून चालणार नाही तर गावोगावी वाचनालय चळवळ सुरू करावी लागेल. याबाबतीत विश्वास पाटील यांनी वर्षभराच्या मुदतीत काही तरी ठोस करावे हीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आज मराठी साहित्यापुढे अनेक प्रश्न आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत आणि मराठी लोक महाराष्ट्रापासून दूर जात आहेत. परभाषिकांनी आक्रमण केले आहे आणि प्रत्येक क्षेत्रात मराठी लोक मागे हटत आहेत किंवा हटवले जात आहेत. याबाबतीत विश्वास पाटील यांनी चळवळ उभारावी हे अपेक्षित आहे. कारण त्यांनी वाचनालय चळवळ उभारण्याचे संकेत दिले आहेत तसेच ते मराठी शाळा वाचवण्यासाठी काही तरी करतील. प्रत्येक मराठी साहित्य संमेलनाने या अगोदर शब्द दिला होता. पण पुढे काहीही झाले नाही. मराठी वाचकांची संख्या फारच कमी आहे आणि आपल्याकडे ना. सी. फडके, आचार्य अत्रे वगैरे वाचणाऱ्यांची पिढी एकेकाळी होती, ती आता अस्तंगत झाली आहे. नव्या पिढीला हॅरी पॉटर वाचण्याचे वेड आहे आणि तेही जाऊन आता मोबाइल आणि इतर गॅझेटेचे वेड आहे. त्यापासून नव्या पिढीला वाचवायचे कसे असा यक्षप्रश्न आहे. तो विश्वास पाटील आणि त्यांच्यासारख्या साहित्यिकांवर ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण त्यांच्यावरच हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आहे आणि त्यांच्याकडे तितकी प्रतिभाही आहे.


विश्वास पाटील हे शेतकरी कुटुंबातून आलेले. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नेर्ले येथे झाला. त्यांचे वडील चौथी पास होते, तर आईने शाळाही पाहिली नाही. त्यांचा विश्वास हा पुत्र आज सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाला. त्यांनी प्रचंड गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्यात. 'पानिपत' आणि 'महानायक' ही सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील कादंबरी प्रचंड गाजली. शेतकरी कुटुंबातून आलेल्या विश्वास यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दुःखे आणि वेदना यांचा जवळू्न परिचय होता, पुढे ते शासकीय सेवेत रुजू झाले तेव्हा त्यांच्या ते कामी आले. शासकीय सेवेत असताना त्यांनी शासकीय योजनांचा लाभ लोकांना कसा देता येईल हे पाहिले. पण त्यांच्या साहित्यिक योगदानाविषयी बोलताना असे म्हणता येईल, की त्यांची साहित्यिक वीण ही त्यांना कादंबरी लेखनाकडे घेऊन गेली. 'महानायक' असो की 'झाडाझडती' या सर्व कादंबऱ्यांतून उपेक्षित वर्गाची तडफड दिसते. पानिपतचा अपवाद वगळता त्यांची ही उपेक्षितांची तडफड नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. साहित्य संमेलन म्हणजे केवळ तीन दिवस मिरवण्याचा उत्सव ही प्रथा विश्वास पाटील बदलून टाकतील यात काही शंका नाही. साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने जनसामान्यांची चळवळ कशी होईल हे पाटील पाहतील यात शंका नाही. विश्वास पाटील यांच्या निवडीने एक सर्वोत्कृष्ट कादंबरीकार आणि साहित्यिकाची निवड झाली आहे. त्यांच्याकडून मराठी रसिकांना अपेक्षाही तितक्याच आहेत.

Comments
Add Comment

महागाईचा जनतेला हादरा

रिटेल इन्फ्लेशन म्हणजे किरकोळ महागाईचा दर गेले नऊ महिने सातत्याने घसरत होता आणि लोकांनाही हायसे वाटले होते. पण

सरन्यायाधीशांचा फटाका!

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा नेहमीच होत असते. वाहनांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण, पीकं

कसरतीची चौथी फेरी

उरलेसुरले वस्त्रहरण रोखण्यासाठी उबाठा गटाच्या चाललेल्या कसरतींमधला आणखी एक अंक गुरुवारी पार पडला. दोन्ही

विरोधकांचा भ्रमनिरास...

देशाच्या घटनात्मक संरचनेतील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन सर्वोच्चपदे एक विशेष धाग्याने जोडलेली आहेत.

आणखी एका शेजाऱ्याच्या घरात...

शेजारच्या घरात आग लागते, त्याची धग आपल्यापर्यंत येते; त्यामुळे नेहमी काळजी घ्यावी, असं म्हटलं जातं. देशाच्या

मणिपूरमध्ये मोदी

देशातील विरोधी पक्षांना एक खोड जडली आहे, ती म्हणजे कुठेही काहीही चांगले पाहायचे नाही. त्यानुसार देशभर बऱ्यापैकी