Tuesday, September 16, 2025

नवरात्रीत थिरकणार रंगीबेरंगी घेर!

नवरात्रीत थिरकणार रंगीबेरंगी घेर!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणानंतर आता तरुणाईला सर्वाधिक भुरळ घालणारा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव! नऊ दिवसांचा हा रंगीबेरंगी उत्सव म्हणजे केवळ उपासना आणि भक्ती नव्हे, तर आनंद, नृत्य, संगीत आणि फॅशनचा उत्सव देखील आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या शारदीय नवरात्रासाठी तरुणाईने आत्तापासूनच तयारीचा धडाका लावला आहे. दांडियाच्या ठेक्यांवर थिरकण्यासाठी रोज वेगवेगळे कपडे, ज्वेलरी आणि स्टाईल दाखवणं हीच खरी मजा. मॉल्स, बुटिक्स, ऑनलाइन शॉपिंग साइट्स सगळीकडे उत्साही खरेदी सुरू असून कपडे, पादत्राणं, दागदागिने, ॲक्सेसरीज यांची जबरदस्त क्रेझ दिसते आहे. गरब्याचा मूड जमवणारा आणि उत्सवाला शोभा आणणारा पेहराव म्हणजे रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेला घागरा-चोळी. परंपरेला धरून हा पोशाख प्रत्येक नवरात्रीत महिलांचा पहिला पसंतीचा पर्याय ठरतो. पण दरवर्षी यामध्ये नवनवीन डिझाइन्स, रंगसंगती आणि फॅशन ट्रेंड्स दिसतात. यंदाही बाजारपेठांमध्ये घागऱ्यांचे हटके कलेक्शन महिलांना खुणावत आहे. जर तुम्हीही या नवरात्रीत दांडियाच्या मैदानात गर्दीतून उठावदार दिसायचं ठरवलं असेल, तर नवीन ट्रेंड्सचे घागरा-चोली नक्कीच ट्राय करा. आता जर तुम्हालाही दांडियाच्या निमित्ताने सुंदर चनिया चोली किंवा घागरा घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला या लेखातून काही नवीन डिझाईन केलेले लेहेंगा-चोली दाखवणार आहोत जे तुम्ही घातल्यानंतरही एकदम हटके आणि गर्दीतूनही उठावदार दिसाल.

१. हेवी वर्क घागरा : हा घागरा तुम्ही कापड घेऊन शिवू सुद्धा शकता. कापड घेऊन शिवल्याने तुम्हाला जसे पाहिजे तसे डिझाइन्स शिवता येऊ शकतात. घागऱ्याला जास्त घेर असेल तर दांडिया खेळताना मस्त दिसू शकतो.

२. फ्लोरल प्रिंट घागरे : हलक्या आणि रंगीबेरंगी फुलांच्या डिझाइन्सचे घागरे मुलींमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. हे दिसायला नाजूक आणि मॉडर्न टच असलेले आहेत. यावर तुम्ही मॅचिंग ज्वेलरी परिधान करू शकता.

३. मिरर वर्क आणि सीक्विन घागरे : गरबा आणि दांडियाच्या रात्री चमकदार घागरे जास्त उठून दिसतात. आरशाचे काम, सीक्विन आणि झरी वर्क असलेले घागरे स्टेजवर किंवा मंडळात चमकदार लूक देतात. तुमचा लूक पण उठावदार दिसेल.

४. फ्यूजन स्टाईल घागरे : आता काहींना घागरा-चोली परिधान करायला नाही जमत किंवा काहीतरी ट्रेंडी आऊटफिट करून गरबा खेळायला जायचं असतं. अशातच आता पारंपरिक घागऱ्यासोबत क्रॉप टॉप, शॉर्ट जॅकेटस, लॉन्ग जॅकेट्स किंवा केप-स्टाईल डिझाइन्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. या स्टाईलमुळे पारंपरिक आणि मॉडर्नचा सुंदर मेळ साधला जातो.

५. पेस्टल शेड्सचे घागरे : पारंपरिक लाल, हिरवा, पिवळा या रंगांबरोबरच या वर्षी पेस्टल शेड्स जसे पिंक, पीच, लॅव्हेंडर आणि स्काय ब्लू यांचीही क्रेझ दिसते आहे. ज्यांना हेवी लूक आवडत नाही त्या मुली या घागऱ्यांना प्राधान्य देतात.

६. ब्लॉक प्रिंट आणि हातमागाचे घागरे नैसर्गिक रंगांनी रंगवलेले ब्लॉक प्रिंट, अज्रख आणि बांधणी घागरे यावर्षी पारंपरिकता जपणाऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

७. लेयर्ड आणि फ्रिल घागरे डान्स करताना घेरदार दिसणारे लेयर्ड आणि फ्रिल घागरे मुलींचा लूक आणखी आकर्षक करतात. आजकाल मुलींना आरामदायी आऊटफिट्स परिधान करायला आवडतात. हलके-फुलके घागरे घेरदार असतात ज्यात मुली सुंदर दिसतात.

Comments
Add Comment